बीड : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील पण पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका पतीने आत्महत्या केल्याची घटना बीडच्या आष्टीमध्ये घडली आहे. अनिल आबासाहेब जगताप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल जगताप हा वन विभागाच्या वन रक्षक म्हणून काम करायचा.
लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब द्या, असा तगादा पत्नीने वनरक्षक असलेल्या पतीच्या मागे लावला. तसेच आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे तिने त्याला मारहाणही केली आणि शेती माझ्या नावावर कर म्हणून सतत त्रास देऊ लागली. पत्नीच्या नेहमीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीसह चौघांवर आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
अनिल यांचा विवाह 2014 साली देसूर येथील अजिनाथ देवराव भवर यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत झाला होता. अवघ्या दहा दिवसातच ते दोघे अनिलच्या नोकरीच्या ठिकाणी शिरुर कडा येथे राहण्यासाठी गेले. त्यानंतर पती-पत्नीत सातत्याने वाद होऊ लागला. लग्नाअगोदरच्या पगारच्या खर्चाचा हिशोब मागू लागली. तसेच तुमच्या आई-वडिलांना पैसे द्यायचे नाही असेही तिने बजावले.
दरम्यानच्या काळात बदलीमुळे ते कडा येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर आई-वडिलांना घरासमोर फरशी करण्यासाठी पैसे दिल्यामुळे अश्विनीने अनिलच्या डोक्यात तुंबा मारला होता. याबाबत अश्विनीच्या आई-वडिलांना कळवले असता त्यांनी मुलीची बाजू लावून धरली. तीन वर्षापूर्वी अनिल बदलीमुळे आष्टीत स्थायिक झाले. त्यानंतर अश्विनीने जमीन नावावर करुन दे, असा तगादा लावत अनिलचा शारीरिक आणि मानसिक सुरु केल्याचा आरोप अनिल च्या वडिलांनी केला आहे..
यावर्षीच्या मे महिन्यात अश्विनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे कारण काढून माहेरी गेली. अनिलने वारंवार फोन करुनही तिने परत येण्यास नकार दिला. जमीन आणि प्लॉट नावावर केल्याशिवाय येणार नाही असे तिने अनिल बजावले. अखेर या सततच्या छळाला कंटाळलेल्या अनिलने 28 मे रोजी दुपारी शृंगेरी देवीचे समोरुन जाणार्या मुगगाव रोडवर एका वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 29 मे रोजी उघडकीस आली.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी अनिल जगताप यांच्या वडिलांचा जबाब नोंदवला होता, त्यानुसार तपास चालू होता. अखेर तपास पूर्ण झाला ज्यात अनिल जगताप यांच्या मृत्यूला पत्नी आश्विनी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी अजिनाथ देवराव भवर, विजुबाई अजिनाथ भवर, अश्विनी अनिल जगताप आणि महेश अजिनाथ भवर या चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन आष्टी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.