शिर्डी : औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदाच्या नेमणुकी संदर्भात राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिर्डी संस्थानवर विश्वस्त मंडळ लवकरच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र विश्वस्त मंडळ नेमताना राज्यातील इतर देवस्थानला डोळ्यासमोर ठेऊन विश्वस्त मंडळ नेमावे, अशी मागणी शिर्डीतील सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. 


शिर्डी हे देशातील दुसऱ्या स्थानावरील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे. देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा मंदिरातील विश्वस्त मंडळ स्थापणेबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नवीन विश्वस्त मंडळ स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली असून लवकरच नवीन विश्वस्त मंडळ स्थापन होणार आहे. असं समजताच अनेक इच्छुकांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र हे सगळं सूरु असताना शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी विश्वस्त मंडळ नेमताना स्थानिकांना संधी देण्याची मागणी केल्याने आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहण महत्वाचं आहे. शिर्डीतील स्थानिकांना विश्वस्तपदी संधी दिल्यास साईभक्तांना त्याचा फायदा होणार असून सरकारने हा विचार करावा अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी  केली आहे.


पंढरपूर, तुळजापूर, सिद्धीविनायक या राज्यातील प्रमुख देवस्थानाबाबत विश्वस्त मंडळ नेमताना स्थानिकांना प्राधान्य दिले जाते. मग शिर्डी बाबत वेगळा न्याय का? असा सवाल आता पुढे येत असून शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळ नेमताना स्थानिकांना संधी देण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांच्या वक्तव्यानंतर समोर आली आहे. त्यामुळे राज्यसरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.