- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
International Women's Day 2023 LIVE: जागर स्त्री शक्तीचा... आज जागतिक महिला दिन; प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...
International Women's Day 2023 LIVE: जागर स्त्री शक्तीचा... आज जागतिक महिला दिन; प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...
International Women's Day 2023 LIVE Updates: 'जागतिक महिला दिन' हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
08 Mar 2023 01:48 PM
सांगलीच्या मिरजेतील गोसावी समाजातील महिला पुरुषांना झोडपून साजरी करतात होळी
सांगलीच्या मिरजेत मोठ्या संख्येने गोसावी समाज वास्तव्यास आहे. या गोसावी समाजाकडून होळी वेगळया पद्धतीने साजरा करण्यात येते. होळीच्या तिसऱ्या दिवशी 'झेंड्याचा खेळ' हा पारंपारिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. ज्यामध्ये महिला या पुरुष मंडळीना काठीने बदडून काढण्याची प्रथा असून गोसावी समाजात वर्षानुवर्ष चालत आली आहे. महिला गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधतात. ज्याची कमान ही महिलांची हाती असते. सर्व महिला या झेंड्याची रक्षण करण्यासाठी हातामध्ये काठ्या घेऊन सज्ज असतात. रंगांची उधळण करत पुरुषांनी तो झेंडा पळवायचा खेळ असतो, तर महिला त्यांना त्यापासून रोखतात. यावेळी पुरुष मंडळीना पिटाळून लवण्यासाठी महिला त्यांना काठीने बदडून काढतात. गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा गोसावी समाज बांधवाकडून जोपासली जात आहे. एरव्ही पत्नीस मारहाण करणारे पती, या निमित्ताने महिलांनाकडून आनंदाने मार खात असतात हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे.
सांगलीत महिला दिनाच्या दिवशीच महिलांनी चूल पेटवत गॅस सिलिंडर दरवाढीचा केला निषेध
सांगलीत महिला दिनाच्या दिवशीच महिलांनी चूल पेटवत आणि चुलीवर भाकऱ्या थापत आंदोलन करत गॅस सिलिंडर दरवाढीचा निषेध व्यक्त केला. सांगली शहरातील स्टेशन चौकात आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशीच महिलांच्या विविध संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. गॅसचे दर प्रचंड वाढल्याने या आंदोलनकर्त्या महिलांनी रस्त्यावर चुली पेटवल्या आणि चुलीवर भाकरी थांपत आंदोलन केले.
आधीच जनता बेरोजगारी, दारिद्र्य आणि महागाईत होरपळून निघत असताना आणखी गॅसचे दर वाढवल्याने जोरदार घोषणाबाजी देत महिलांनी एकूणच वाढत चाललेल्या महागाईचा जोरदार निषेध व्यक्त केला.
जागतिक महिला दिनानिमित्त वाळवा तालुक्यातील कलाशिक्षकाने स्त्रीशक्तींचा फलकलेखनातून केला गौरव
स्त्रीशक्तींचा फलकलेखनातून गौरव करण्याचे काम अरविंद कोळी या कलाशिक्षकाने केलेय. वाळवा तालुक्यातील कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनि. कॉलेज, पेठ येथे शाळेच्या दर्शनी फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने अरविंद कोळी यांनी हे फलकलेखन केले आहे. महिला दिनाच्या या फलक रेखाटनासाठी अरविंद कोळी यांना तीन तासहुन अधीक वेळ लागला. सदरचे फलकलेखन सर्वांचे लक्ष वेधत आहे. अरविंद कोळी यांनी मागील वर्षी ताराराणी मराठी चित्रपटातील महाराणी ताराराणी यांची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केली आहे. त्यांचे चित्र फलकावर रेखाटले होते. त्याची दखल स्वतः सोनाली कुलकर्णी यांनी घेतली होती.
जागतिक महिला दिनानिमित्त विविध मागण्यासाठी महिलांचा मोर्चा
जागतिक महिला दिनाचा विजय असो, नारी शक्ती झिंदाबाद,वाढती महागाई कमी करा,पाणी पुरवठा सुरळीत करा अशी घोषणाबाजी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी केली. वाढत्या महागाईमुळे घराचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.पाणी पुरवठा नियमित नसल्याने समस्या उदभवत आहेत. महिलांच्या वर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजना करावी अशी मागणी महिलांनी केली.आपल्या मागणीचे निवेदन महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
सांगलीत महिला दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ महिलांनी लेझीम पथकाचे प्रात्यक्षिक केले सादर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सांगलीतील स्माईली हास्य क्लबने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये 60 वर्षांवरील वयोगटातील महिलांचे लेझिम पथक स्थापन करण्यात आले आणि या लेझिम पथकाचे प्रात्यक्षिक आज महिला दिनी पार पडले. 60 वर्षांवरील वयोगटातील महिलांनाही व्यासपीठ मिळावे यासाठी स्माईली हास्य क्लबकडून 60 वर्षांवरील महिलांचे लेझिम पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये 60 वर्षापासून ते अगदी 75 वर्षांपर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. महिला दिनाचे औचित्य साधून या जेष्ठ महिला लेझीम खेळ खेळताना दिसून आल्या.
या सर्व महिलांना सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी लेझिंमचे प्रशिक्षण दिले आहे. आज महिला दिनी सांगलीत 60 वर्षांवरील महिलांच्या पहिल्या लेझिम पथकाचे प्रात्यक्षिक पार पडले. यामध्ये महिलांनी मनसोक्त असा सहभाग घेत लेझीम खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
Womens Day : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त यंदा प्रथमच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचं आयोजन
Womens Day : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त यंदा प्रथमच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेटला सध्या प्राप्त होत असलेलं ग्लैमर, आणि बीबीसीआयनं नुकतच सुरू केलंल महिला आयपीएल. यामुळे ही महिला क्रिकेट लीग तरूण खेळाडूंसाठी एक मोठा प्लैटफॉर्म ठरू शकते. या लीगमध्ये 52 क्लब सहभागी झाले असून 780 महिला खेळाडूंना या स्पर्धेमधून क्रिकेटचं कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लब विरुद्ध फोर्ट यंगस्टर्स यामधील उद्घाटनीय सामन्यातून मुंबईच्या क्रॉस मैदानातून या लीगला सुरूवात झाली.
एमसीए महिला क्रिकेट लीगमध्ये 52 महिला संघ 13 गटवारीमध्ये साखळी सामन्यांसाठी विभागले गेले आहेत. साखळी सामन्यांमधून गट-विजेता एकच संघ बाद फेरीत प्रवेश करणार असल्यामुळे प्रत्येक गटामधील सामने चुरशीचे होतील. मुंबईतील ऐतिहासिक अशा कांगा साखळी स्पर्धेने जसे भारताला अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले तशाच अनेक महिला क्रिकेट खेळाडू मुंबईला व पर्यायाने भारताला मिळावेत या हेतूने ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आली आहे.
जागतिक महिला दिननिमित्त उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या महिलांनी केला काळया फिती लावून रेल्वे प्रवास
मध्य रेल्वेच्या उपनगरीय ट्रेनमधील महिलांची वाढत जाणारी गर्दी आणि प्रवासातील महिलांची असुरक्षितता याकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महिला दिनी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघकडून महिला प्रवाशांना काळी फीत लावून प्रवास करण्याचा आवाहन करण्यात आलं होतं. आज सकाळपासून आसनगांव, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली या स्टेशनवरील प्रवासी संघटना प्रतिनिधी महिलांना काळ्या फितीचे वाटप करन्यात आले .यावेळी महिलांनी काळया फिती लावून रेल्वे प्रवास करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
Pune News: पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये महिला दिन साजरा
Pune News: आज जागतिक महिला दिनानिमित्त पुणे मुंबई रेल प्रवास करणाऱ्या चाकरमानी प्रवासी महिलांनी सिंहगड एक्स्प्रेसमध्ये लोणावळा बोगीत केक कापून तसेच एकमेकींना गुलाबाचे पुष्प वाटप करत मोठ्या आनंदाने महिला दिन साजरा केला. यावेळी सह प्रवासी पुरुष मंडळींनी टाळ्या वाजवून या सर्व सावित्रीच्या लेकीचं स्वागत केलं. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने धावणारी सिंहगड एक्स्प्रेस लोणावळा स्टेशनवर येताच महिलांनी एकच जल्लोष केला,तर दुसरीकडे या महिला प्रवाशांनी लोणावळा बोगीत पाऊल ठेवताच चाकरमानी पुरुषांनी फुलांचा वर्षाव करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Jalgaon News: जागतिक महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये भव्य शोभायात्रा
Jalgaon News: जागतिक महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव मनपाच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव जनजागृतीसाठी भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे.
यावेळी जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन ,मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्या सह मनपा च्या महिला अधिकारी कर्मचारी ,अंगणवाडी सेविका, डॉकटर, शिक्षिका आरोग्य सेविका यांचा ही मोठा सहभाग होता. नारी शक्ती जिंदाबाद,च्या घोषणा या वेळी देण्यात येत होत्या.
पार्श्वभूमी
International Women's Day 2023 LIVE Updates: 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. तसेच, लिंग समानतेचे महत्व पटवून देण्यासाठीदेखील हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक महिला दिन हा दिवस आज जरी समाजात महिलांचा सत्कार करून साजरा केला जात असला तरी, हा दिवस उजाडण्यामागे एक इतिहास आहे. हा इतिहास नेमका काय? महिला दिन का साजरा केला जातो आणि याचं महत्त्व काय ते समजून घेणं गरजेचे आहे.
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरातील स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती.
महिला दिनाचा इतिहास
8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात एकत्र येऊन प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला.
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .
1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले. आणि त्यानुसार संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.