जळगाव : 31 डिसेंबर या सरत्या वर्षाच्या अखेरीस अनेकजण दारू-मटणाच्या पार्ट्या करण्यासाठी सज्ज झाल्याने चिकन-मटण मार्केट सकाळपासूनच गजबजलेलं पाहायला मिळालं. एकीकडे बकऱ्यांची आणि कोंबड्यांची कत्तल होतानाचे चित्र असताना, जळगाव (Jalgaon) शहरातील हरी विठ्ठल नगर भागातील विक्रम कापडणे परिवाराने मात्र आपल्या कोंबड्याचा (cock) 5 वा वाढदिवस साजरा करुन सगळ्याचे लक्ष वेधले आहे. कारण, 31 डिसेंबर म्हणजे कोंबड्याला कापण्याचा, शिवजवून खाण्याचा दिवस, त्यासाठी खास कोंबड्यांची अगोदर पाहणी देखील अनेकांकडून केली जाते. पण, जळगाव शहरातील विक्रम कापडणे हे अनेक वर्षांपासून कुक्कुट पालनाचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळेच, त्यांना आपल्या कोंबड्यांबद्दल एक वेगळाच जिव्हाळा देखील आहे.
शहरातील विक्रम कापडणे यांच्याकडे असलेल्या एका कोंबडीने पाच वर्षांपूर्वी काही पिले जन्माला घातली होती. मात्र, त्यात एकच पिल्लू जिवंत राहिले होते, अशातच कोंबडीला देखील मांजराने पळवून नेल्याने या एकट्या पिलाचा सांभाळ कापडणे कुटुंबीयांनी केला. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून ते या कोंबड्याचा सांभाळ करत आहेत. लहानपणांपासून या कोंबड्याला घरातल्या लहान बाळाप्रमाणे त्यांनी सांभाळल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळेच कुटुंबीयांचा कोंबड्यासोबत वेगळाच आपलेपणा निर्माण झाला आहे. कोंबडा आणि कापडणे परिवाराला एकमेकांविषयी जिव्हाळा निर्माण झाला आहे. घरातील सदस्याप्रमाणे 5 वर्ष या कोंबड्याला कापडणे परिवार सांभाळत असल्याने, 31 डिसेंबर रोजी त्याचा येणारा वाढदिवसही ते साजरा करत आहेत. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून ते दरवर्षी न चुकता आपल्या लाडक्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा करत आहेत.
चिमण्या नावाने कोंबडा प्रसिद्ध
कोंबड्यांचा वाढदिवस साजरा करताना त्याला हार घालून, औक्षण करुन आणि केक भरवत हे जंगी सेलीब्रेशन होतं. गेल्या पाच वर्ष पासून या कोंबड्यांचा सांभाळ करताना, मांजर आणि कुत्र्यांनी कोंबड्यावर हल्ला करत त्याला जखमी केले होते. पण, त्यांच्या तावडीतून सोडवत, त्याच्यावर उपचार करुन त्याला जीवदान दिल्याचं अनघा कापडणे सांगतात. लहान असताना हे कोंबडीच पिलू चिमणी सारखे दिसत असल्याने त्याचं नाव चिमण्या ठेवण्यात आलं. त्यामुळे, सध्या येथील परिसरात हा कोंबडा चिमण्या नावानेच प्रसिद्ध आहे. तर,त्याला सांभाळणारे कापडणे परिवार देखील चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, सगळीकडे न्यू इयरचे जल्लोषात आणि आवडीचे पदार्थ बनवून सेलिब्रेशन सुरू असताना कापडणे कुटुंबीयांचं हे कोंबडा प्रेम अनेकांना विचार करायला आणि प्राणीमात्रांवर दया करायला भाग पाडणारं आहे.