बुलडाणा : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण परिस्थितीतही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. बुलडाण्याच्या खामगावात पोलिसांसाठी जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने कोविड केअर सेंटरची सुरवात करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरचे उदघाटन राजेश टोपे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


कोरोनाच्या लढाईत प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळाच माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही मेहनत करतात. आपलं कर्तव्य बजावत असताना काही पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना 50 लाखांचं विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी केली.


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अकोला, जळगाव जिल्हा दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा



जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं की सदर व्यक्ती पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली. तसेच यात दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला त्याला हे कवच मिळणार आहे. तसेच कोरोनाचे काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना 50 लाखांचं हे विमा कवच मिळणार आहे.




आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या केंद्रीय योजनेचा लाभ आधीपासून मिळत आला आहे. कोविडविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी (रोजंदारी, कंत्राटी, बाह्यसेवेद्वारे घेतलेले, मानसेवी असे सर्वं कर्मचारी) अशा सर्वं घटकांना 50 लाख रुपयांच्या विमासंरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ही योजना विमा कंपनीच्या सहकार्यानं राबविण्यात येणार असली तरी यासंदर्भातील पॅकेज अंतिम होईपर्यंत, अंतरिम निर्णय म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून हे 50 लाखांचे सानुग्रह अनुदान संबंधीतांना देण्यात येणार आहे.