गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील सिरोंचा येथे महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवर 2 कोटी 20 लाखांची रक्कम पकडली आहे. दोन वेगवेगळ्या वाहनातून राज्यात ही रक्कम आणली जात होती. तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने कंत्राटदाराने नक्षल्यांना खंडणी दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
नक्षल्यांना मोठी रक्कम पोहोचवली जात असल्याच्या घटनेने गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी केली नाकाबंदी करुन ही कारवाई केली. 2 वेगवेगळ्या वाहनातल्या पिशवीतून 2 कोटी 20 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यातील एक स्कॉर्पिओ वाहन चंद्रपूर पासिंगचे तर दुसरे तेलंगाणा राज्यातील आहे.
या प्रकरणी पोलिसांनी 2 वाहनचालकांना अटक केली असून ही वाहने अतिदुर्गम, नक्षल संवेदनशील भामरागड तालुक्यात जात होती. तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू झाल्यावर यात आडकाठी येऊ नये यासाठी कंत्राटदार नक्षल्यांना अशी खंडणी देत असतात. हा प्रकार त्यातलाच असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोन्ही वाहनचालकांना ताब्यात घेत पोलिसांनी विचारपूस सुरू केली आहे. नोटबंदीनंतर नक्षल्यांचे कंबरडे मोडले असल्याच्या चर्चेनंतर जिल्ह्यात अशी बेहिशेबी रक्कम सापडण्याची पहिलीच घटना आहे.
गडचिरोलीत 2 कोटी 20 लाखांची रक्कम जप्त, नक्षल्यांना खंडणी म्हणून पैसे दिले जात असल्याचा अंदाज
रोमीत तोंबर्लावार, एबीपी माझा
Updated at:
04 Jun 2020 11:35 AM (IST)
तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने कंत्राटदाराने नक्षल्यांना खंडणी दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गडचिरोलीत एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -