मुंबई : राज्य सरकारने मिशन बिगिन अगेनबाबत जारी केलेल्या काही नियमात बदल करण्यात आले आहेत. यात महत्वाचं म्हणजे MMR क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रवासासाठी आता पासची गरज नाही. MMR रिजनमध्ये कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रवास करता येणार असल्याचे या नव्या नियमात म्हटलं आहे. तसंच खासगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीत सुरू करण्याच्या परवानगीतही बदल करण्यात आला आहे. आता 10 टक्के उपस्थिती अथवा 10 लोकांच्या उपस्थितीत जो आकडा जास्त असेल त्या क्षमतेने खाजगी कार्यालये 8 जूनपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण 7 जूनपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
विद्यापीठे, कॉलेज आणि शाळा यातील शिकवण्याचे काम सोडून इतर कामांसाठी सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात ऑनलाइन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश, यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलवता येणार असल्याचे या नव्या नियमात म्हटलं आहे.
देशभरात लॉकडाऊन-5 ची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊन बाबतची नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारनेही 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. मात्र राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल-हॉटेल आणि मंदिरेही बंदच ठेवण्यात येणार आहेत.
3 जूनपासून खालील सूट लागू होणार
- प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी
- गॅरेजही सुरू करण्यास परवानगी, मात्र आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना
- सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थितीस परवानगी, आधी ही उपस्थिती 5 टक्के होती
कंटेंनमेंट झोनमध्ये कोणतीही शिथिलता नाही
- मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट
- यात संचारबंदी सकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सूट
- ग्रुपने एकत्र जमा होण्यास बंदी
- शारीरिक कसरतीसाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी, यासाठी जवळच्या मोकळ्या जागांची वापर करता येणार, दूर जाण्यास मनाई
5 जूनपासून खालील सूट
- मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरणार, सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषय तारखेला समोरच्या रस्त्यातील दुकाने खुली राहणार
- कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार
- दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदाराने घ्यायची, यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरायचे
- खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत,अथवा सायकलने जाण्याच्या सूचना
- अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई
- खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते
8 जूनपासून खालील बाबींमध्ये सूट
- सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के उपस्थिती अथवा 10 लोकांच्या उपस्थितीत जो आकडा जास्त असेल त्या क्षमतेने चालवण्यास परवानगी
- उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय
- कामाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना
- अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी 1 चालक 1 प्रवासी, रिक्षा 1 चालक 2 प्रवासी, खाजगी चारचाकी 1 चालक 2 प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवास करण्याची परवानगी
उर्वरित राज्यात
-परवानगी दिलेल्या सेवा सुरू करण्यास सरकारच्या किंवा कोणत्याही यंत्रणेच्या परवानगीची गरज नाही
- खुली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियम आणि मोकळी मैदाने व्यायामासाठी खुली करण्याची परवानगी, मात्र एकत्र येऊन ग्रुपने कोणतेही व्यायाम प्रकार करता येणार नाहीत
- स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियमच्या अंतर्गत भागात कोणतीही परवानगी नाही
- जिल्हा अंतर्गत बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्यास परवानगी
- सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी
- गर्दी आढळल्यास मात्र बंद करण्याचा इशारा
- राज्याबाहेर जाण्यासाठी किंवा आपल्या राज्यात येण्यासाठी परवानगीची गरज लागणार
- राज्यांतर्गत एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात अथवा दुस-या शहरात प्रवासासाठीही परवानगीची गरज लागणार
- संपूर्ण राज्यात खालील बाबींवर बंदी कायम
- शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार
- मेट्रो बंद राहणार
- स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार
MMR क्षेत्रात प्रवासासाठी आता पासची गरज नाही, सरकारकडून काही नियमात बदल
रश्मी पुराणिक, एबीपी माझा
Updated at:
04 Jun 2020 03:24 PM (IST)
देशभरात लॉकडाऊन-5 ची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊन बाबतची नियमावली जाहीर केली आहे.
राज्य सरकारनेही 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आता काही नियमात बदल केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -