Antilina Case : "सचिन वाझेला (Sachin Vaze) पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी दबाव होता असा जबाब माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambeer Singh) यांनी काल ईडीला दिला होता. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एक गंभीर आरोप केला आहे. "सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून त्यांना शिवीगाळ केली जाते आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, असा आरोप परमबीर सिंह यांनी केलाय.


परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेला जबाब आरोपपत्रात नमूद करण्यात आलाय. "चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट झाली होती. त्यावेळी वाझे यांनी ईडीला दिलेला जबाब परत घ्यावा म्हणून देशमुख यांनी त्यांच्यावर  दबाव टाकला होता. शिवाय या भेटीदरम्यान दोघांमध्ये चर्चा झाली होती, असा आरोपही परमबीर सिंह यांनी केलाय. 


परमबीर सिंह यांनी दिलेल्या जबाबानुसार अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात 30 नोव्हेंबर 2021 रोजी चांदीवाल आयोगाच्या सुनावणीवेळी भेट झाली होती. 


परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सचिन वाझे मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत असताना त्यांच्यासोबत चर्चा केली होती. यावेळी पाटील यांनी सचिन वाझे यांच्यावर दबाव आणला होता. याबरोबरच उपायुक्त पाटील आणि वाझे यांच्यामध्ये चांदीवाल आयोगासंदर्भात एक गुप्त बैठकही झाली होती."


दरम्यान, कालही परमबीर सिंह यांनी असाच गौप्यस्फोट केला होता. सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिली होती. त्याशिवाय बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब स्वत: घेऊन येत असल्याचेही परमबीर सिंह यांनी काल ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती समोर आली आहे. 


महत्वाच्या बातम्या