Nagpur News : 'ऑपरेशन नार्को फ्लशआऊट' च्या (Operation Narco Flush Out) दुसऱ्या टप्प्यात शहरातील प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधींची विक्री करणाऱ्या फार्मसी नागपूर पोलिसांच्या रडारवर आहेत. शहरातील औषधांच्या दुकानांवर 'वॉच' ठेवण्यासाठी दहा नोव्हेंबरपर्यंत फार्मसी दुकानदारांना सीसीटीव्ही लावणे अनिवार्य असल्याचे आदेश नागपूर पोलिसांनी दिले आहे. याचे पालन न करणाऱ्या दुकानांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे.


गेल्या काही वर्षांत अनेक औषधांचा वापर नशा करण्यासाठी करण्यात येतो. या औषधांवर प्रशासनाकडून बंदी असतानाही काही विशिष्ट फार्मसींच्या माध्यमातून त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येते. त्यामुळे या फार्मसींचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आता प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, असे आदेश काढण्यात आले आहेत.


शहरात अनेक औषध विक्रेते त्यांच्या दुकानातून प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री करतात आणि नशेखोर प्रिस्क्रिप्शन शिवाय नशेखोरीच्या उद्दिष्टाने काही विशिष्ट औषधांची खरेदी करुन नशा करतात. याच प्रक्रियेत पुढे घरात आणि वस्त्यांमध्ये गुन्हे घडतात असा पोलिसांचा अभ्यास आहे. पोलिसांनी (Nagpur Police) सीआरपीसीच्या कलम 133 अन्वये परिपत्रक ही काढले असून अन्न व औषध प्रशासन विभागाला ही सूचना दिली आहे. दरम्यान, औषध विक्रेत्यांनी ही शहरातील अनेक विक्रेते प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री करतात, खासकरुन तरुण आणि लहान मुले अल्प्राझोलम आणि झोपेच्या औषधांची मागणी करतात असे मान्य केले आहे. आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबद्दल पोलिसांच्या आदेशाचे पालन करु अशी भूमिका बहुतांशी औषध विक्रेत्यांनी घेतली आहे. मात्र, आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावू, प्रिक्स्क्रिप्शन शिवाय औषध विक्री करणार नाही, असे असले तरी ऑनलाईन होणाऱ्या औषध विक्रीचे काय. तिथे पोलीस कसे नियंत्रण ठेवणार असा रास्त प्रश्न ही औषध विक्रेत्यांनी विचारला आहे.


शहरातील '22 हॉटस्पॉट' चिन्हीत


शहरातील टेका वस्ती, हुडको कॉलोनी आणि काही परिसरातून सातत्याने हा प्रकार घडत असल्याने पोलिसांची या परिसरावर करडी नजर राहणार आहे. शहरातील 22 हॉटस्पॉट तयार करण्यात आले असून दररोज पोलिस विभागाच्या माध्यमातून तेथील फार्मसीचा आढावा घेण्यात येणार आहे. व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये नशेतून मुक्त होण्यासाठी बरेच तरुण येत असतात. मात्र, अनेकदा या केंद्रांना पुरेसा निधी मिळत नसल्याने या रुग्णांवर योग्यरित्या उपचार होताना दिसून येत नाही. अशा केंद्रातील रुग्णांना उपचारासाठी जिल्हा नियोजन समिती, सीएसआरमधून मदत करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. सध्या शहरात 30 व्यसनमुक्ती केंद्र कार्यरत आहेत.


'नार्को फ्लशआऊट' मोहिमेंतर्गत 44 गुन्हे


नागपूर पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यांत 'ऑपरेशन नार्को फ्लशआऊट' ही मोहीम सुरु केली होती. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत विविध शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील 200 अवैध पानठेले बंद केले आहेत. कोष्टा कायद्यांतर्गत 1 हजार 138 गुन्हे दाखल झाले आहे. तसेच एनडीपीएस अंतर्गत 44 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील तीन ते चार वर्षात एनडीपीएस अंतर्गत गुन्हे दाखल झालेल्या 1 हजार 110 आरोपींपैकी 921 जणांची झाडाझडती घेण्यात आली आहे.


महत्त्वाची बातमी


शिंदे पुत्र Vs ठाकरे पुत्र! ठिकाण अन् तारीख एकच; आता सामना रंगणार वारसदारांमध्ये