Aaditya Thackeray Vs Shrikant Shinde: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आता वारसदारांवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे आता ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहे. कारण एकाच दिवशी एकाच मतदारसंघात ही दोन्ही युवा नेते शक्तिप्रदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे बहुचर्चित राहणारे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचं होमपीच समजल्या जाणाऱ्या सिल्लोडमध्ये हा सामना रंगणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबावर सतत टीका करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात 7 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे मेळावा घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्याची घोषणा होताच अब्दुल सत्तार यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सुद्धा त्याच दिवशी सिल्लोडमध्ये सभा होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून आपापल्या नेत्याच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सभेला की श्रीकांत शिंदे यांच्या सभेला अधिक गर्दी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
आता सामना वारसदारांमध्ये!
एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा अधिक आमदार सोबत नेत शिवसेनेत बंडखोरी केली. तेव्हापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पाहायला मिळतोय. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. परंतु या दोन्ही नेत्यातील वाद आता वारसदारांपर्यंत येऊन पोहचला आहे. सिल्लोड येथील सभेत उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे मेळावा घेणार आहेत, तर त्याच दिवशी सिल्लोडमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची सुद्धा सभा होणार आहे. त्यामुळे या दोन्ही युवराजांपैकी कोण मैदान मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
मतदारसंघ एक सभा दोन!
यापूर्वी दसऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने एकाचवेळी मेळावे घेतल्याने मोठी चर्चा झाली होती. आता तशीच काही परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण एकाच दिवशी एकाच मतदारसंघात दोन सभा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून छोटा पप्पू, दोन नंबरचा पप्पू असा आदित्य ठाकरेंचा अब्दुल सत्तार उल्लेख करतायत. त्यामुळे सत्तार यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे मेळावा घेऊन प्रत्युत्तर देणार आहे. पण याचवेळी सत्तार यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना मैदानात उतरवलं असल्याने सामना आणखीच रंगणार आहे.