Teachers Constituency Elections Nagpur : नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चार ते पाच प्रमुख उमेदवार लढत आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्यातील विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचाही समावेश आहे. चंद्रपूर शहराचा आमदार म्हणून माझी भूमिका त्यात निर्णायक आहे, असे लोकांना वाटत आहे, पण तसे काहीही नाहीय, असे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) म्हणाले. 


यासंदर्भात आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, ही निवडणूक लढत असलेल्या सर्व उमेदवारांना मला भेटीची वेळ मागितली आहे. पण अजून कुणाशीही भेट झालेली नाही आणि यासंदर्भातील भूमिका अद्याप ठरवलेली नाही. आम्ही अपक्ष आमदार महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी आहोत. पण आम्हाला सत्तेतील संबंधिकांकडून कुठलेही निर्देश अद्याप आलेले नाहीत.


राज्यातील अपक्ष आमदारांचा अद्याप निर्णय नाही


या निवडणुकीत चंद्रपूरचे विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे सुधाकर अडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांच्यात मुख्यत्व करुन लढत होईल असे वाटते. पण माझ्यासह एकूणच महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांनी याबाबत काही निर्णय घेतलेला नाही. आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे निवडणुकीचे चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यानंतर कदाचित आमचाही काही निर्णय होण्याची शक्यता आहे. 


सरकारच्या चांगल्या निर्णयांना पाठिंबा


सभागृहाच्या पटलावर, सरकारच्या चांगल्या कामांसाठी आणि चांगल्या निर्णयांसाठी आमचा सरकारला पाठिंबा आहे. ठिकठिकाणची परिस्थिती बघून अपक्ष आमदार आपला निर्णय घेत असतात. महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी असलो तरी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, हे आम्हा अपक्षांना बंधनकारक नाहीये. त्यामुळे योग्य वेळी आम्ही आपला निर्णय घेऊ. 


अद्याप मागणी नाही...


या क्षणापर्यंत महायुतीचे नेते किंवा उमेदवारांकडून आम्हाला समर्थन मागण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्याच निर्णय घेण्याची घाई नाही. जेव्हा नेत्यांकडून काही सूचना येतील आणि उमेदवार ॲप्रोच होतील, तेव्हा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.


नाट्यमय घडामोडींनी रंगली नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक


नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अर्ज दाखल केल्यापासून नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. त्यानंतर आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीकडून चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकमेव उमेदवार शिवसेनेचे गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. आता महाविकास आघाडीतील तिघे आणि भाजपचे नागो गाणार यांच्यात मुख्य लढत होणार आहे.


ही बातमी देखील वाचा...


मॅट्रिमोनी साईटवरील ओळख तरुणीला महागात; लग्नाचे आमिष दाखवून उकळले 6 लाख; तब्बल चार महिन्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल