Aurangabad Fire News: औरंगाबादच्या वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या एका 'चटाई कंपनी'ला भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. मोठ्याप्रमाणावर आग लागल्याने परिसरात सर्वत्र आगीचे लोट पाहायला मिळत आहे. तर घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला नागरी वस्ती असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या सोहेल 'चटाई कंपनी'ला आज सोमवारी आग लागली आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी चालू होती. तसेच कंपनीत काही कामगार देखील कामाला होते अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्यातरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे माहिती समोर आली आहे. पण आगीचे प्रमाण अधिक असल्याने आणखी काही अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्यतीचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी औरंगाबाद महानगरपालिका, गरवारे कंपनी, बजाज कंपनी यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी बोलवण्यात आल्या आहेत. पण आगीवर नियंत्रण मिळत नसल्याचे चित्र आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या दोन तास उशिरा
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीला आग लागल्यावर याची माहिती पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यासाठी तब्बल दोन तास लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तोपर्यंत कंपनीचा मोठा भाग जळून खाक झाला होता. सकाळी पावणे अकराच्या सुमारास लागलेली आग दुपारी दीड वाजेपर्यंत देखील आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
शेजारील घरालाही आग...
आग लागलेल्या सोहेल 'चटाई कंपनी'च्या आजूबाजूला नागरी वसाहत देखील आहे. दरम्यान कंपनीला आग लागल्याने बाजूला असलेल्या बोबडे नावाच्या व्यक्तीच्या दोन मजली घराला देखील आग लागली आहे. त्यांच्या घरातील सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र आजूबाजूला राहणाऱ्या इतर नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणावर भीतीची वातावरण आहे. तर दुसरीकडे एकूण सात अग्निशमन दलाचे बंब आणि इतर खाजगी तीन पाण्याच्या टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
संबंधित बातमी: