Matrimony fraud News Nagpur : सोशल नेटवर्किंगसह आता मॅट्रिमोनी (Matrimony) वेबसाईटवरही सायबर भामट्यांकडून फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढल झाली आहे. अशीच मॅट्रिमोनी साईटवरील ओळख नागपुरातील (Nagpur Cyber Fraud) एका 29 वर्षीय तरुणीला महागात पडली आहे. आरोपीने प्रथम ओळख वाढवून विश्वास निर्माण केला आणि त्यानंतर तिच्याकडून 6 लाख रुपये उकळले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार तरुणीने वराच्या शोधात जीवनसाथी डॉट कॉम (jeevansathi.com) या मॅट्रिमोनी साईटवर प्रोफाईल तयार केला होता. आरोपीने सुद्धा याच साईटवर बनावट प्रोफाईल तयार केला होता. संतोष कावळे (वय 29 वर्षे रा. येवती मांडवा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतः सेल्सटॅक्स इन्स्पेक्टर असल्याचे आणि पुण्यात राहत असल्याचे दर्शवले होते. प्रोफाईल पसंत आल्याने एकमेकांसोबत बोलणे सुरु झाले. आरोपीच्या रुबाबदार बोलण्यामुळे पीडितेचा सहज विश्वास बसला.
वेगवेगळी कारणे सांगून त्याने पैशांची मागणी सुरु केली. युवतीनेही आयुष्याचा जोडीदार म्हणून त्याला मदत करण्यात हात आखडता घेतला नाही. जुलै ते सप्टेंबर दरम्यान थोडेथोडे करत 6 लाख रुपये दिले. यानंतरही आरोपीकडून पैशांची मागणी सुरुच होती. पैसे देण्याबाबत असमर्थता दर्शवल्यास आरोपी टाळाटाळ करत होता. यामुळे तरुणीला शंका आली. तिने प्रोफाईलबाबत खात्री केली असता सर्वच माहिती खोटी असल्याचे समोर आले. यामुळे सप्टेंबर महिन्यात पीडितेने तक्रार नोंदवली होती. पोलिसांच्या तपासात तक्रार योग्य असल्याचे निष्पन्न झाल्याने बलतरोडी पोलिसांनी (Nagpur Police) तब्बल चार महिन्यांनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
पोलिसांकडून टाळाटाळ
ऑनलाईन होणाऱ्या फसवणुकीबद्दल नागरिकांकडून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्यावर त्यासंदर्भात योग्य समुपदेशन करण्यात येत नसल्याची तक्रार अनेक नागरिकांकडून करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी दिघोरीमध्ये राहणाऱ्या एका आर्किटेक्ट तरुणीसोबत ऑनलाईन लोन अॅपद्वारे फसवणूक करण्यात आली होती. तिचे फोटो मॉर्फकरुन अश्लील फोटो तिच्या नातेवाईक आणि पालकांना पाठवण्यात आले होते. या घटनेनंतर तरुणी घाबरली आणि तिने ओळखीच्यांना हा प्रकार सांगितल्यावर एका मित्रासोबत तिने आधी प्रशासकीय इमारत येथे असलेले सायबर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली होती. मात्र त्यानंतर संबंधीत अधिकाऱ्याने तुम्ही ऑनलाईन तक्रार करा असा सल्ला देण्यात आला. तरुणी पोलीस स्टेशनमध्ये असताना तिला लोन अॅप प्रतिनिधीचा फोन आला. यावेळी तिने पोलिसांना फोनवर त्याच्याशी बोलण्यास सांगितले असता पोलीस अधिकाऱ्याने चक्क बोलण्यासाठीही नकार दिला होता. तसेच तरुणीची तक्रार न नोंदवता तिला परत पाठवले होते, हे विशेष.
ही बातमी देखील वाचा...