इंदापूर : इंदापूरमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. हीच दुचाकी खासगी प्रवासी बसखाली अडकडून फटफटत गेल्याने लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवल्याने आणि वेळीच बसमधील सर्व प्रवासी सुखरुप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. 


पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी देवकर गावच्या हद्दीत हा अपघात घडला. एका अज्ञात दुचाकी चालकाने चुकीच्या बाजूने येऊन अशोक लेलॅण्ड ट्रकला समोरुन धडक दिली. या अपघातात अज्ञात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या अपघात रस्तावर पडलेली दुचाकी पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघालेल्या खाजगी प्रवासी बस खाली अडकून फरफटत गेल्याने बसला आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढलं. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे लोणी देवकर गावच्या हद्दीत तोंडेवस्तीजवळ अशोक लेलॅण्डचा ट्रकचा चालक अनिल पाटील हा पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे निघाला होता. यावेळी चुकीच्या दिशेने येणारा दुचाकीस्वार ट्रकला जाऊन धडकला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी जोरदार होती की यात अशोक लेलॅण्ड ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटला. 


झालेल्या अपघातात रस्त्यावर पडलेली मोटारसायकल ही पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणारी लक्झरी बसच्या खाली गुंतली गेली. बसने ही मोटारसायकल काही अंतरापर्यंत फरफटत नेली. याच दरम्यान मोटारसायकलने पेट घेतल्यामुळे तात्काळ बस थांबवून त्यामधील सर्व प्रवासी सुखरुप खाली उतरले. या आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या मदतीने बसला लागलेली आग विझवण्यात आली.


इतर महत्त्वाच्या बातम्या