Beed Car Accident : धामणगाव घाटात कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर येतेय. या अपघातात बीडमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय


एका प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंबातील चौघांचा दुर्देवी मृत्यू


बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगांव घाटात त्याचवेळी त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यु झाला आहे. टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.


धामणगाव घाटातील वाहतूक काही काळ ठप्प


अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. तिकडे अपघातामुळे धामणगाव घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.



कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे.. 


काही दिवसांपूर्वी भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे घडली होती. या अपघातात इतर चार जण गंभीर जखमी झाले होते. अंबाजोगाईहून नातेवाईकांचा अंत्यविधी उरकून कार चालक अलिम शेख आणि दीपक वैजनाथ राजारोशे आपली कार  (एमएच 24 व्हीव 2518) मध्ये बसून अहदपूरकडे परत जात होते. कार चालवणाऱ्या अलिम शेख यांचा ताबा सुटल्याने नवाबवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीस त्याने समोरुन जोराची धडक दिली. त्यानंतर घटनांदूर येथे मुख्य चौकात उभे असलेल्या चौघांना कारने जोराची धडक दिल्याने सौरभ सतीश गिरी(वय 19) लहू बबन काटुळे (वय 30) हे दोघे जागीच ठार झाले. तर रमेश विठ्ठल फुलारी (वय 45) याला उपचारासाठी लातूरला घेऊन जात असताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला