Raosaheb Danve : समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं असेल तर राज्य सरकारने या महामार्गासाठी पन्नास टक्के पैसे द्यावेत असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. मनमाड ते मुदखेड रेल्वेच्या विद्युतीकरणाचं उद्घाटन आज जालन्यात रावराहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी दानवे बोलत होते. 


"समृद्धी महामार्गाला आम्ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देणार होतो. परंतु, आता राज्य सरकार बाळासाहेब ठाकरे यांच नाव देत आहे. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं असेल तर राज्याने पन्नास टक्के पैसे द्यावे लागतील. याबरोबरच यापुढे कोणत्याही रेल्वे प्रकल्पासाठी राज्याला पन्नास टक्के पैसे द्यावे लागतील. राज्यातील रेल्वे प्रकल्पाला पैसे दिले तरच प्रकल्प होतील असे मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हंटलं आहे. 


दरम्यान, मनमाड ते मुदखेड रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी, जालना नगरपालिकेत हातात कमळ राहील, अशा घोषणा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत दिल्या. गोरंट्याल यांनी मंत्री दानवे यांच्यासमोर अशा घोषणा दिल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री भागवत कराड यांनी आमदार गोरंट्याल यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. 


विद्युतीकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड आणि आमदार गोरंट्याल हे एकाच व्यासपिठावर उपस्थीत होते. यावेळी गोरंट्याल यांनी उर्जुन खोतकर यांच्यावर टीका करत रावसाहेब दानवे यांचे कौतुक केले आणि आगामी नगरपालिकेत आपल्या हातात कमळ राहणार असल्याचे सांगत भविष्यात नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप युतीचे संकेत दिले आहेत. 


महत्वाच्या बातम्या