Mumbai Corona Update : राज्यातील कोरोनाची लाट ओसरल्याचे दैनंदिन आकडेवारीवरुन दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर मोठ्या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवीरानुसार, शनिवारी मुंबईत फक्त 31 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 64 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, मुंबईत शनिवारी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही. शुक्रवारीही मुंबईत कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. मागील काही दिवसांपासून मुंबईतील नव्या कोरोना रुग्णांची संख्या 100 हून कमी आढळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली, तरी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


मुंबईत कमी आढळणाऱ्या रुग्णांमुळे कोरोना रुग्ण दुपटीचा दरही वाढत आहे. आज हा दर थेट 15 हजार पार गेला असून 16692 दिवसांवर पोहोचला आहे. कोरोनामुक्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 347 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 31 रुग्णांपैकी 06 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 359 बेड्सपैकी केवळ 183 बेड वापरात आहेत. रुग्णालयात आज दाखल केलेल्या सहा रुग्णांपैकी फक्त एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे, त्या रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 






पुणे-मुंबईत एकही मृत्यू नाही - 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पनवेल आणि अहमनगर येथील रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. पुणे आणि मुंबई या शहरात आज एकाही मृत्यूची नोंद नाही.


कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 324 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 525 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या दोन हजार 721 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  शनिवारी पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुणे मनपामध्ये शनिवारी 70 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. बीएमसीमध्ये 31, नवी मुंबई मनपा 13, अहमदनहर 25, धुळे 12, पुणे ग्रामीण 56, पिंपरी चिंचवड 13, बुलढाणा 12 या ठिकाणी राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इतर जिल्ह्यातील रुग्ण दहापेक्षा कमी आहेत.  दिलासादायक म्हणजे अनेक ठिकाणी शनिवारी एकही रुग्ण आढळला नाही. यामध्ये चंद्रपूर मनपा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती मनपा, अकोला मनपा, अकोला, नांदेड, लातूर, परभणी मनपा, हिंगोली, जालना, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, सांगली मिरज कुपवाड मनपा, कोल्हापूर मनपा, सालापूर मनपा, जळगाव मनपा, मालेगाव मनपा आणि ठाण्याचा समावेश आहे. तर 14 ठिकाणी फक्त एक रुग्ण आढळला आहे.