Bacchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडु (Bacchu Kadu) यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडु (Indirabai Babarao Kadu) यांचे शनिवारी दुपारी 12.45 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 84 वर्षाचे होते.
बच्चू कडूंच्या जीवनाला वळण देणारी मायेची ज्योत विझली..
इंदिराबाईं कडू यांच्या जाण्याने बच्चु कडु यांच्या जिवनाला वळण देणारी मायेची ज्योत मालवल्याची प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चु कडु यांनी दिली. कर्मयोगी गाडगेबाबा हे बच्चु कडुचे प्रेरणा आणि आदर्श असले तरी या समाजसेवा आणि रुग्णसेवा सारख्या कर्माला खऱ्या अर्थाने वास्तवात उतरविण्यास बच्चू कडूंना त्यांच्या आईनेच चालना दिली. सामान्य माणसावरील अन्याय विरोधात लढण्याची प्रेरणा या मायनेच दिली. वेळ प्रसंगी बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होण्यासही त्यांनी मागेपुढे पाहीले नाही. अखेरचा श्वास जसे धरणीमायच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावून आपले सैनिक सीमेवर लढतात. तसा समाजाच्या शेवटचा घटक आणि शेतकऱ्यासाठी लढ असा आदेशच इंदिराबाईंनी बच्चु कडू यांना दिला होता. त्यांच्या मागे सहा मुले, चार मुली, सुना, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या बेलोरा येथील निवासस्थानावरुन निघणार आहे.
11 दिवस चाललेल्या उपोषणात आईचाही होता सहभाग
अचलपुर जिल्हा निर्मीतीसह 11 मागण्यांच्या पूर्ततेसाठी तत्कालीन आमदार असलेल्या बच्चू कडू यांनी गाडगेबाबांच्या नागरवाडी या कर्मभुमीत आमरण उपोषण सुरु केले. तब्बल 11 दिवस चाललेल्या या उपोषणात त्यांच्या पत्नी नयनासह आई इंदिराबाईनेही सहभाग घेतल्याने तत्कालीन गृहमंत्री स्व.आबा पाटील यांनी याची दखल घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. बच्चू कडूंना राजकारण आणि समाजकारणात सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. हीच त्यांची माया आणि प्रेरणा आज बच्चू कडूंच्या राजकिय आणि सामाजिक यशाचे, प्रगतीचे गमक ठरली. हिच प्रेरणा आणि आदर्श भविष्यात टिकवून ठेवणे हीच खरी इंदिरामायला श्रध्दांजली ठरणार आहे.