Ramdas Athawale : "अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने अडीच वर्षाच्या फार्म्युल्याचा अवलंब करून भाजप सोबत यावं. अपेक्षेप्रमाणे चार राज्यात आमची सत्ता आली आहे. शिवसेनेने असं आव्हान दिलं तर त्यांचा सुपडा साफ होईल, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे. याबरोबरच 2024 मध्ये आम्ही सर्वांचा पराभव करू, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.  


रामदास आठवले यांच्या हस्ते आज शिर्डी येथे राहता मतदारसंघात वयश्री योजनेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि  खासदार सुजय विखे-पाटील उपस्थितीत होते. यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. 


"काँग्रेसला वयश्री योजनेची गरज असून गांधी कुटुंबा व्यतिरिक्त अध्यक्ष नेमण्याची गरज आहे. काँग्रेसने भाजपला आव्हान देण्याचं काम करू नये. आता गांधी कुटुंबाचं आकर्षण संपलं आहे, असा हल्लाबोल रामदास आठवले यांनी केला आहे. 


खासदार सुजय विखे-पाटील यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. "मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली. काँग्रेसची ही अवस्था होणार हे माहीत असल्यामुळेच मी आधीच भाजपात आलो आहे. महाराष्ट्रात काँग्रेस लाचार पक्ष झाला आहे. राष्ट्रवादी आणि शिसेनेच्या बिन बोलवलेल्या लग्नाला काँग्रेस वराती म्हणून सहभागी झाला आहे. काँग्रेसने आता 40 चे शून्य होण्याची वाट पाहावी आणि नवीन सुरवात करावी. " असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. "शिवसेनेची मंडळी करमणुकीचे साधन आहे. त्यांनी आता तिकीट लावून करमणूक केली पाहिजे. उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, बोलघेवड्या माणसांमुळे पक्षाची अधोगती होईल. त्यामुळे भविष्यात सेनेला कोणी गांभीर्याने घेईल असं वाटत नाही, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या