एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मूक पतीकडून पत्नीला व्हॉट्सअॅपवर तीन वेळा 'तलाक'चा मेसेज
वसई : व्हॉट्सअॅपवरुन पतीने केलेल्या तलाकच्या एका मेसेजने डहाणूतील फरहाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. फरहाचं 13 वर्षांचं वैवाहिक जीवन सोशल मीडियावरच्या एका मेसेजने संपुष्टात आलं आहे.
फरहाच्या नवऱ्याने तीन महिन्यांपूर्वी तिला व्हॉट्सअॅपवर 'तलाक तलाक तलाक' असा मेसेज पाठवला होता. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे फरहाचा पती मोईन हा अपंग आहे. त्याला बोलता किंवा ऐकता येत नाही.
फरहाच्या माहेरची परिस्थिती अगदी बेताची तर मोईनच्या घरी श्रीमंती. आम्ही फरहाची व्यवस्थित काळजी घेऊ, असं वचन मोईनच्या आईवडिलांनी फरहाच्या आईवडिलांना दिलं, आणि म्हणूनच तिचं लग्न अपंग मोईनशी झालं.
लग्नानंतरची काही वर्षे अगदी आनंदात गेली. फरहाला तीन मुलेही झाली. मोईनशी बोलताना संवाद साधताना अडचण येऊ नये म्हणून फरहा आणि मुलांनी खुणांची भाषा ही शिकून घेतली. पण हळूहळू परिस्थिती बदलली. मोईन आणि फरहामध्ये भांडणं व्हायला लागली. तो तिला माहेरहून पैसे आणायला सांगायचा, मारहाण करायचा, असा आरोप फरहाने केला आहे.
आपल्या मुलांच्या भविष्याच्या काळजीने फरहा सर्व निमूटपणे सहन करत होती. पण एक दिवस मोईनने फरहाला तलाक दिलाच, तोही चक्क व्हॉट्सअॅप वर एक मेसेज करुन.
फरहाने या प्रकारच्या तलाकला साफ नकार दिला, मात्र मोईन त्याच्या म्हणण्यावर अडून बसला आहे. त्याने 4 दिवसांपूर्वी फरहा आणि मुलांना घराबाहेर काढलं. सध्या फरहा आपल्या मुलांबरोबर रस्त्यावर राहते. दरम्यान मोईनने दुसरं लग्न केल्याचीही माहिती आहे. तरीसुद्धा फरहा आपल्या सवतीसोबत रहायला तयार आहे. तिला फक्त आपल्या घरी जायचं आहे, मात्र मोईनला फरहा आपल्या घरात नको.
तिने याबाबत कासा पोलीस ठाण्यात तक्रारही केली आहे. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट फरहाचा दीर साजिद वोरा याने फरहावर ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
हजारो लाखो महिलांप्रमाणे फरहालाही वाटतं की अशाप्रकारे एखादा शब्द एखाद्या महिलेचे आयुष्य असे उद्ध्वस्त करता कामा नये. स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे. मात्र फरहाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
राजकारण
Advertisement