मुंबई : भाजपला देणगी द्या, त्यामुळे देश बलाढ्य होईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशात संभ्रम निर्माण झाला असून, भाजपला पैसा दिल्याने देश कसा मजबूत होईल? असा खडा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. देणग्या द्या ,असे म्हणणे हा भाजपचा उद्योगपतींना संदेश आहे. पंतप्रधानांनी देशाविषयी बोलले पाहिजे असेही राऊत यावेळी म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला पैसे द्या असे आवाहन करणे योग्य नाही. कारण, पंतप्रधान हे देशाचे असतात. ते कोणत्या एका पक्षाचे नसतात. ते देशाचे सेवक असतात, असे राऊत यावेळी म्हणाले. भाजपचे राष्टीरय अध्यक्ष जे पी नड्डा किंवा राज्यांमधील इतर सदस्यांनी देणगी देण्याचे आवाहन केले असते तर वेगळी गोष्ट होती, पण पंतप्रधांनी असे आवाहन करणे योग्य नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले.


राज्यपालांचा इतका अभ्यास बरा नाही


आपले राज्यपाल फार अभ्यासू आहेत, त्यांचा इतका अभ्यास बरा नाही, त्यांना अभ्यासाचं ओझ झेपलं पाहिजे असे वक्तव्य राऊत यांनी केले. लॉकडाऊनमध्ये राज्यपालांचा अभ्यास कमी पडला आहे. राज्यपालांनी घटनेत जे लिहलय त्यानुसार काम करावे. घटनेत मंत्रीमंडळाच्या शिफारसी राज्यपालांनी मान्य करणे बंधनकारक आहे. असे असतानाही 12 आमदारांच्या शिफारशी ते मान्य करत नाहीत असे राऊत म्हणाले. 'शांतता अभ्यास सुरू आहे' असे नवीन नाट्य सध्या राजभवनात सुरू असून, यामध्ये भाजपचे लोक सहभागी असल्याचे राऊत म्हणाले. 


राज्य सरकारचे कौतुक झाले की विरोधक नाराज होतात


राज्य सरकारचे कौतुक झाले किंवा सकारात्मक काही घडले की विरोधक नाराज होतात. पण हा विरोधकांना झालेला एक आजार आहे, त्यावर कसा उपचार करायचा हे आम्ही लवकरच पाहू असेही राऊत म्हणाले. भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यावर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, ही कायदेशीर बाब आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे. जर कोणी गुन्हा केला असेल तर, त्यावर कारवाई होते.  त्या भागातले दोन पालकमंत्री यावर बोलतील. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही असे राऊत म्हणाले.


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपने पक्षनिधी उभारण्यासाठी मोयक्रोडोनेशन अभियान सुरू केले आहे. दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीपर्यंत (11 फेब्रुवारी) हे अभियान सुरू राहणार आहे. यात पाच रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत देणगी देता येणार आहे. भाजपच्या या देणगी अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. पंतप्रधानांनी पक्षनिधीसाठी 1 हजार रुपयांची देणगी जमा केली होती. यावेळी बोलताना त्यांनी  'भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रहित नेहमीच सर्वोच्च स्थानी राहिलं आहे आणि त्याच मार्गाने आम्ही पुढे जात आहोत. आमचे कार्यकर्ते निस्वार्थी भावनेने आजीवन सेवाकार्य करत आहेत. तुमचं छोटंसं दान या सेवाकार्याला बळकटी देण्याचे काम करेल. भाजपला बळकट करण्यासाठी, देशाला भक्कम बनवण्यासाठी योगदान द्या', असे आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. याच त्यांच्या विधानावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: