Sanjay Raut :  विरोधी पक्षांचे 12 काय 50 खासदार निलंबित करा, मात्र आम्ही केंद्र सरकारला सातत्याने प्रश्न विचारणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याप्रकरणात गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरात मोर्चा काढला. त्यावेळी संजय राऊत बोलत होते. 


संजय राऊत यांनी म्हटले की, मंत्री पुत्राने शेतकऱ्यांना कसे चिरडले हे देशाने नव्हे तर संपूर्ण जगाने पाहिले आहे. महाराष्ट्रात काय सुरू आहे, असा प्रश्न गृहमंत्री आम्हाला महाराष्ट्रात  येऊन विचारला होता. मात्र, त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात हत्या, बलात्कार, शेतकऱ्यांची हत्या यावर बोलत नाही. भाजपच्या नेतृत्वातील सरकारने लखीमपूरमधील घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती.  आता एसआयटीने दिलेल्या अहवालही सरकार मान्य करत नाही.  


सरकारने विरोधकांचे 12 खासदार निलंबित केले होते. आता, 50 खासदार निलंबित केले तरी आम्ही सरकारला वारंवार प्रश्न विचारणारच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. शेतकऱ्यांची हत्या करणारे मंत्रिमंडळात आहेत त्यांना मंत्रिमंडळातून निलंबित करेपर्यंत आम्ही प्रश्न विचारणार असेही राऊत यांनी सांगितले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रात्रीच त्या ठिकाणी भेट दिली नसती तर उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या हत्येचे प्रकरण दाबले असते. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे विरोधकांच्यावतीने आभार मानत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.  


दरम्यान, या मोर्चात काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, सध्या देशात सरकार त्यांचे काम करत नाही. शेतकऱ्यांवर, सामान्य जनतेवर अन्याय सुरू असून, हा अन्याय कदापी सहन करणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले आहे. या घटनेवर पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. पंतप्रधान एका बाजूला शेतकऱ्यांची माफी मागतात आणि दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळात हत्या करणाऱ्याला ठेवतात असेही गांधी यावेळी म्हणाले. देशात शेतकऱ्यांच्या विरोधात जे केले जात आहे, ते आम्हाला मान्य नाही हा संदेश देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असल्याचे गांधी म्हणाले.