(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Holi 2021 | होळीनिमित्ताने रेवस- करंजाच्या समुद्रात कोळ्यांच्या सुशोभित होड्यांनी वेधलं लक्ष
होळीच्या निमित्ताने होडीच्या पुढच्या नाळीवर मोठे मासे बांधले जातात आणि मच्छिमार बांधव हे आपल्या कुटुंबासोबत नजीकच्या समुद्रात सफरीसाठी जातात
Holi 2021 : होळीचा उत्सव हा कोळी समुदायासाठी एक मोठा सण. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातल्या कोळी बांधवांनी आज आपल्या होड्या पताका लावून तर काहींनी फुलांच्या माळा लावून सजवल्या होत्या. प्रत्येक होडीवर गाण्यांच्या तालावर कोळी बांधवांनी नाचत होळीच्या सणाचा आनंद लुटला.
होळीचा उत्सव हा कोकणी बांधवांचा मोठा सण, तर समुद्रकिनारी राहणारे आगरी- कोळी बांधव देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव हे होळीचा हा सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतात. हेच चित्र राज्यातील इतरही कोळीवाड्यांमध्ये पाहायला मिळतं.
वर्षभर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणारे आगरी - कोळी बांधव हे व्यवसायानिमित्त कुटुंबापासून अनेक दिवस दूर राहतात. पण, होळीच्या या उत्सवानिमित्त मच्छिमार बांधव हे आपल्या होड्या घेऊन घरी परतात. यावेळी, होळीच्या दिवशी या मच्छिमार होड्यांची पूजा करण्यात येत असून यानिमित्ताने कुणी होड्याना रंगीबेरंगी पताकांचे तोरण लावून सजवल्या तर कुणी होड्यांना फुलांच्या माळा लावल्या होत्या.
होळीच्या निमित्ताने होडीच्या पुढच्या नाळीवर मोठे मासे बांधले जातात आणि मच्छिमार बांधव हे आपल्या कुटुंबासोबत नजीकच्या समुद्रात सफरीसाठी जातात. यावेळी, घरातील बच्चेकंपनी आणि महिला सुद्धा नटून- थटून या सफरीमध्ये सामील होतात. तर, होळीच्या या सणानिमित्त हे मच्छिमार बांधव बोटीमध्ये गाण्यांच्या तालावर नाच करीत एकमेकांना रंग लावीत आपला आनंद साजरा करतात. यावेळी, बच्चेकंपनी आणि तरुण हे दुसऱ्या बोटीतील कुटुंबियांवर रंग फेकत होळीचा आनंद घेत असतात. तर , कोळी बांधवांच्या या उत्साहामुळे रेवस आणि करंजा दरम्यानच्या समुद्रामध्ये सजलेल्या बोटींची रेलचेल सुरू असते.