एक्स्प्लोर
चंदगडमधील निराधार कुटुंबाला सोशल मीडियावरुन मदतीचा हात!
चंदगड (कोल्हापूर) : पतीचं निधन, त्यानंतर दुखणं, त्यात तीन मुलांची जबाबदारी, त्यात म्हातारे सासू-सासरे.... असा गाडा वंदना प्रकाश पाटील हाकत होती. त्यात दुखणं वाढलं आणि त्याच दुखण्यात मृत्यू झाला. बाप गेला, मागोमाग आईचंही निधन. तीन पोरं अनाथ झाली. घरात साताजन्माची गरिबी. मदतीला जवळपास कुणीच नाही. अशातच काही हात सरसावले आणि या अनाथ मुलांना आधार देऊ केला आणि माणुसकीचं दर्शन घडवलं. त्यांचीच ही कहाणी.
बोंजुर्डी. कोल्हापुरातील निसर्गरम्य चंदगड तालुक्यातील एक गाव. याच बोंजुर्डीतील वंदना पाटील यांचं 11 जुलै रोजी निधन झालं. वंदना यांच्या निधनानं संपूर्ण चंदगड तालुका हळहळला. त्याचं कारणही तसंच होतं.
वंदना यांची घरची शेतीवाडी नाही. दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. अशा परिस्थितीत वंदनावर आपल्या दोन मुली आणि एका मुलासह आपल्या वृद्ध सासू-सासऱ्यांची जबाबदारी पडली. पतीच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून वंदना यांनी घरात चूल पेटावी, म्हणून दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरीला सुरुवात केली.
जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन, घरात रोज चूल पेटेल यासाठी वंदना यांनी अपार मेहनत केली. मुलांना शिकवून मोठे करायचे आणि सासू-सासऱ्यांचा सांभाळ करायचा, एवढंच ध्येय तिने डोळ्यासमोर ठेवलं होतं.
घराचा गाडा हाकताना वंदना यांच्या गळ्यात गाठ झाली. पण तिने ते दुखणे अंगावर काढले. कारण प्रकृती ठीक नाही, हे कळल्यावर सासू-सासरे आपल्याला कामावर जाऊ देणार नाहीत, हे वंदना यांना माहित होतं. म्हणून त्यांनी त्यांच्यापासून आपलं आजारपण लपवून ठेवलं. पर्यायाने व्हायचं तेच झालं. आजारपण वाढलं आणि त्यातच 11 जुलै रोजी वंदना यांचं निधन झालं.
वंदना यांच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरात कमावते कुणीच नव्हते. तीन मुलं, सासू-सासरे यांनी मोठा आधार गमावला. म्हातारपणामुळे सासू-सासरे काम करु शकत नाहीत, तर तिन्ही मुलं शिक्षण घेत आहेत.
वंदना यांची मोठी मुलगी पूजा नववीत, दुसरी मुलगी पूनम सातवीत शिकत असून, तर मुलगा प्रसाद अवघ्या सहा वर्षांचा आहे. नातवंडांना सांभाळायचं कसं, हा प्रश्न म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला.
अशाच कठीण काळात चंदगडमधील सहृदयी या मुलांच्या मदतीसाठी धाऊन आले. या निराधार कुटुंबाला मदत करण्यासाठी सोशल मीडियाद्वारे काही मोठ्या दिलाच्या माणसांनी पुढाकार घेतला. ‘आम्ही चंदगडी’ या व्हॉट्सअप ग्रुप आणि तालुक्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरु झाला.
तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा आणि घरातील रोजचा खर्च भागवण्यासाठी या माध्यमातून मदत गोळा केली जात आहे.
सोशल मीडियाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर आणि माणुसकीचं दर्शन म्हणून या गोष्टीकडे नक्कीच पाहिलं जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement