एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईसह राज्यात दमदार पाऊस, 24 तासात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई आणि उपनगरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र पहाटेपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याचं चित्र आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई आणि उपनगरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र पहाटेपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याचं चित्र आहे.
शहर आणि उपनगरात दमदार पाऊस
दक्षिण मुंबईसह कांदिवली, अंधेरी, दहिसर, बोरिवली या पश्चिम उपनगरांत तर मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपरसह अनेक पूर्व उपनगरात ठिकठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी जोरदार पाऊस बरसला. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडंही कोसळली.
24 तासात अतिवृष्टीचा इशारा
येत्या 24 तासात मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस पडू शकतो. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काळू नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे टिटवाळा-रुंदे गावातील काळू नदीवरील पुलावरुन पुराचं पाणी वाहत आहे. यामुळे कल्याण आणि टिटवाळा शहराशी 15 गावांचा एक रस्ता बंद झाला आहे. मात्र पर्यायी व्यवस्था सुरु आहे. काळू नदीला पूर आल्याने नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठाणे जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
नाशिकमध्ये विक्रमी पाऊस, मुलगा नाल्यात वाहून गेला
नाशिक जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाने जागोजागी पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला असून लोकांचे हाल होत आहेत. नाशिकच्या पंचवटी हनुमानवाडी परिसरातील नाल्यात शाळकरी मुलगा वाहून गेला आहे. अग्निशमन दल, पोलिस आणि स्थानिक नागरिकांकडून मुलाचा शोध सुरु आहे. पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यानं मुलगा वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग
नाशिकच्या दारणा धरणातून 12 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे धरण सध्या 71 टक्के भरल्यामुळे नदी किनारी असलेल्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी कुटुंबासह जाऊ नये, असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलं आहे.
सोमेश्वर धबधबा दुथडी भरुन
गंगापूर रोडवरील सोमेश्वर धबधबा दुथडी भरुन वाहू लागलाय. रात्रभर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या धबधब्यात प्राण आले आहेत. अनेक नागरिकांनी सोमेश्वराचं रौद्र रुप पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस
महाराष्ट्रातील माथेरानमध्ये 24 तासात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. स्कायमेटने ही माहिती दिली आहे. माथेरानमध्ये आतापर्यंत 199 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement