मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह आलेल्या या पावसाने अनेक जिल्ह्यात शेतीच्या कामाला ब्रेक लावलाय. तर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाताली काही जिल्ह्यामध्ये आज पाऊस बरसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.


तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यातील भात कापणीला ब्रेक लागला आहे. अनेक शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली तर कापलेली भातशेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. कापलेल्या भाताला कोंब आले तर गवत कुजण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात 14 ऑक्टोबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. संपुर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट असून मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असेही आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे. कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असून या काळात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहतील. शिवाय समुद्र खवळेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.


बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा तडाखा सलग दुसऱ्या दिवशीही बघायला मिळाला, काल झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान मोजत नाही तर आज दुसऱ्या दिवशीही दुपारनंतर अचानक आलेल्या पावसाने शेतात पिक काढत असलेल्या शेतकऱ्यांना मात्र पिक वाचविण्यासाठी धावपळ करावी लागली. सध्या सोयाबीन, कापूस शेतात तयार आहे, पण या परतीच्या पावसाने मात्र नुकसान होत आहे.


सांगली जिल्ह्यात काल (शनिवार 10 ऑक्टोबर) अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. कडेगाव, मिरज, तासगाव वाळवा यासह अनेक भागात मुसळधार पावसामुळे पिकाचे नुकसान झालंय. या बरोबरच सध्या जिल्ह्यातील द्राक्ष बागायती पट्ट्यात छाटण्या सुरु आहेत. या छाटण्यांना देखील या मुसळधार पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. छाटणीनंतर द्राक्ष बागेच्या काड्या जोमाने फुटाव्या म्हणून लावली जाणारी पेस्ट कालच्या मुसळधार पावसाने वाहून गेली. यामुळे या द्राश बागायतदाराना पुन्हा काड्यांना पेस्ट लावण्याची वेळ आली आहे. यामुळे खर्च वाढत आहे. तर काही शेतकरी सकाळी लवकर बागांना पेस्ट लावण्याचे काम करत आहेत. जेणेकरून पाऊस येईपर्यत काड्यांना लावलेली पेस्ट वाळून जावी आणि काड्या फुटण्यास त्याचा फायदा होईल.


कालपासून राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस आणि वादाला सुरूवात झाली होती. या दरम्यान बीडच्या कासारी बोडखामध्ये बाजरी काढून ठेवलेल्या ढिगावर वीज कोसळली आणि क्षणार्धात पेटलेल्या बाजरीच्या ढिगाचा कोळसा झाल्याची घटना घडलीय. धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथे रात्री पावसासोबत विजाचांही मोठा कडकडाट होता. त्यातच वीज कोसळली. बाबासाहेब बडे या शेतकऱ्याच्या दोन एकर मधील बाजरी काढुन लावलेल्या ढिगावर वीज पडुन आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.


'महंगाई डायन खाये जात है', पालेभाज्या, फळभाज्या खाणं महागलं, दर पाचपटीने वाढले


जालना जिल्ह्यात आज सर्वदूर पावसाने धुवाधार हजेरी लावली, सलग दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस बरसत असून, जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. या जोरदार पावसाने परतूर तालुक्यात काही मिनिटातच रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले. जोरदार आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र आणखीनच भर पडलीय. काढणीला आलेली सोयाबीन, उडीद त्याच बरोबर कापसाचे मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झालंय.


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात पुन्हा एकवेळा मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्याची धाकधूक वाढली. कसंबसं हाती आलेलं पिक आता परतीच्या पावसाने जाणार असल्याचं चित्र आहे तर पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.


मागच्या पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये अधूनमधून येणाऱ्या पावसाने खरीप पिकाचे मोठे नुकसान केलं आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले आहे. खरिपाच्या पिकांची काढणी झाली आहे. मात्र, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेल्या कपाशीचे मात्र या पावसामुळे नुकसान होताना पाहायला मिळत आहे. ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त मदार ही परतीचा मान्सूनवरती असायची त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा परतीचा मान्सून नुकसानदायक ठरत आहे.


सोलापूरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. काल संध्याकाळी जवळपास जिल्ह्यातील सर्व भागात पावसाने हजेरी लावली होती. आज पुन्हा सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर इथही मुसळधार पावसाने हजेरी लावली. बार्शी तालुक्यातील काही भागात देखील पावसाची जोरदार बॅटिंग झाली.


Returning Rain | सांगली जिल्ह्यात पावसाचं धुमशान; मका, कडबा, ऊस, द्राक्ष पिकांचं नुकसान