मुंबई :  मागील काही दिवसांपूर्वी आरेतील जागा जंगल घोषित केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री म्हणाले की,  आरेतील जागा जंगल घोषित केली आहे. त्यावेळी 600 एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून 800 एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत 800 एकराचं जंगल असणार आहे. आहे ते टिकवणं आपलं काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.


आरेतील प्रस्तावित कारशेड आता कांजूरमार्गला होणार


दुसरी महत्वाची घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आरेतील प्रस्तावित कारशेड आता कांजूरमार्गला होणार. आरेत कारशेड होणार आहे की नाही याबाबत देखील महत्वाची घोषणा त्यांनी केली. आरेत कारशेड होणार  कांजूरमार्गची सरकारी जमीन शून्य रुपये किमतीत देणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. जनतेचा एकही पैसा खर्च होणार नाही. या जागेसाठी एकही रुपया खर्च केला जाणार नाही, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कांजुरची जमीन शून्य रुपये किंमतीने सरकारने दिलेली आहे. त्यावर आता मेट्रो कारशेड उभे राहणार आहे. आरे जंगलात साधारण 100 कोटींचा खर्च करून एक बिल्डींग उभारली आहे. ते पैसे वाया जाणार नाहीत. बिल्डींग अन्य कारणासाठी वापरणार आहोत. एकही पैसा वाया जाऊ देणार नाही, असं ते म्हणाले.


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जंगलात शहरे होत आहेत परंतु जगाच्या पाठीवर शहरात जंगल कुठे होत नाही. ते आपण करत आहोत. 800 एकरवर शहरामध्ये आपण जंगल वसवणार आहोत. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहाय्य आहे. पर्यावरण मंत्री नात्याने आदित्य ठाकरे, महसुल मंत्री थोरात, मंत्री सुनील केदार, मेट्रो संबंधित अधिकारी या सर्वांनी आपुलकीने, प्रेमाने काम केले. ही जीवसृष्टी, वृक्ष वल्ली सोयरे केवळ म्हणण्याऐवजी कृतीत आणून विकासाचे स्वप्न खरे करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मेट्रो आणि आरेसाठी कारशेडचा मुद्दा चर्चेत होता. अनेक पर्यावरणवाद्यांनी आंदोलनं केली होती. याची जबाबदारी कुणीतरी घ्यायला हवी. आंदोलन करणाऱ्या पर्यावरणवाद्यांवर गुन्हे दाखल केले. ते गुन्हे मागे घेतले आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.