मुंबई : गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. यावेळी ग्रामीण भागासह शहरांनाही याचा मोठा फटका बसला आहे. अगदी तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहरातल्या अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही ठिकाणी घरातही शिरले आहे. तर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.


गेल्या चार दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. सांगली शहरात सकाळपासून धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातल्या अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलं आहे, तर रस्ते जलमय बनले आहेत. जिल्ह्याच्या इतर ठिकाणीही दमदार पावसाची हजेरी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे पाच जणांना या पावसामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. तर शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


पंढरपूर तालुक्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने अजून विश्रांती घेतलीच नसून अजूनही अखंड बरसात असल्याने सर्वत्र पाणीपाणी झाले आहे. पंढरपुरात ठिकठिकाणी पाणी साठले असून चंद्रभागा वाळवंटात या पावसामुळे बेवारसांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. शेतातील उभ्या पिकात सर्वत्र पाणी झाल्याने पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या परिसरात मागील तीन दिवसांपासून पाऊस पडतोय. यातच भर म्हणून रात्रभर पावसाने हजेरी लावली आहे. पंढरपूर तालुक्यातील विविध सर्कलमध्ये मिळून 197 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.


मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटणार! मांजरा धरणात 77 टक्के पाणीसाठा


या पावसाने ऊस, मका, तुर, ज्वारी या पिकासह डाळिंब, द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकातच फूट दोन फूट पाणी साचले आहे. हे पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहेत. तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. पळशी येथील मारुती जाधव यांचा हाताला आलेला कांदा या पावसाने मातीमोल झाला आहे.


परतीच्या पावसाने लातूर जिल्ह्यात जोरदार आगमन केलं आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. मात्र, काल संध्याकाळपासून पावसानं जोर धरला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. त्यात लातूर 56 मिलीमीटर, औसा 81 मिलीमीटर, अहमदपूर 28 मिलीमीटर, निलंगा 110 मिलीमीटर, उदगीर 64 मिलीमीटर, चाकूर 65 मिलीमीटर, रेणापूर 34 मिलीमीटर, देवनी 90 मिलीमीटर, शिरूर आनंतपाळ 79 मिलीमीटर, जलकोट 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. निलंगा देवनी आणि शिरूर अनंतपाळ भागात मात्र पावसाचा जोर जास्त होता.


रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. सध्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांना देखील समुद्रात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आले आहे. पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.


चार दिवस पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र


तळकोकणात परतीच्या पावसाची संततधार


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वत्र पावसाची संततधार सुरू असुन दोडामार्ग मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस 75 मी. मी. पाऊस पडला असून जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 270 मी. मी. पाऊस पडला आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 14 व 15 ऑक्टोबरला मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे. या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे नुकसान होत आहे. तर समुद्र किनारी 40 ते 50 प्रति तास वेगाने वारे वाहत असून मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा मच्छ विभागाने दिला आहे. कणकवली तालुक्यातील कोंडये गावातील मयुरी मंगेश तेली ही महिला अवकाळी पावसाच्या पाण्याने ओहोळाला आलेल्या पूरामध्ये वाहून गेली होती. महिलेचा मृतदेह कोंड्ये, तेलीवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ओहोळामध्ये आढळून आला अशी माहिती तहसीलदार कार्यालय कणकवली यांचेकडून प्राप्त झाली आहे.


परतीच्या मान्सूनने मराठवाडा ओलाचिंब


बीड-लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील 172 गावांची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात आज 76 टक्यांच्याही पुढे पाणी संचय झाला आहे. विशेष म्हणजे मागच्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. त्यामुळे धरण लवकर भरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.


मांजरा धरणावरचं लातूर शहर आणि एमआयडीसीच्या पाण्याची मदार असल्याने मांजरा धरणाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मांजरा धरण भरण्यासाठी अवधी असला तरी मांजरा धरणावर असलेले बंधारे मात्र पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मांजरा धरणाच्या वरच्या बाजुस नदीच्या उगमस्थानापासुन 14 बंधारे आणि लहानमोठे असे 26 तलाव तयार करण्यात आल्याने हे सगळे छोटे छोटे प्रकल्प भरल्यानंतरच धरणात पाणी जमा होते.


Nitin Gadkari | मुंबईतल्या पाण्याचा शेतीसाठी वापर; नितीन गडकरींची कल्पक योजना