बीड : परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केल्याने मराठवाडा ओलाचिंब झालाय. मात्र अशाही परास्थितीमध्ये मांजरा धरणात 77 टक्के पाणी साठा झालाय. धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने मांजरा धरण भरण्याचे वेध लागले आहेत. ज्या धरणात पाणी नसल्याने लातूरला पाण्याची ट्रेन धावली होती, ते हेच मांजरा धरण आहे. मराठवाड्यात जिथे धरणे ओसंडून वाहत आहेत तिथे बहुतेक सगळ्यात उशीर भरणारे धरण म्हनून मांजराचा उल्लेख करावा लागेल.


बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील 172 गावांची तहान याच मांजरा धरणातून भागवली जाते. आज 76 टक्यांच्याही पुढे पाणी संचय झाला आहे. विशेष म्हणजे मागच्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पाण्याचा ऐवढा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लवकरच धरण भरण्याची अपेक्षा आहे.


मांजरा धरणावरच लातूर शहर आणि एमआयडीसीच्या पाण्याची मदार असल्याने मांजरा धरणाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मांजरा धरण भरण्यासाठी अवधी असला तरी, मांजरा धरणावर असलेले बांधरे मात्र पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मांजरा धरणाच्या वरच्या बाजुस नदीच्या उगमस्थानापासून 14 बंधारे आणि लहानमोठे असे 26 तलाव तयार करण्यात आल्याने हे सगळे छोटे छोटे प्रकल्प भरल्या नंतरच धरणात पाणी जमा होते.


मांजरा धरणाची संपूर्ण पाणी साठवण क्षमता 224.083 दलघमी एवढी असून आज धरणात 171.183 दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजे धरण पुर्णक्षमतेने भरण्यासाठी 54 दलघमी पाणी साठ्याची आवश्यकता आहे. मान्सूनच्या आगमनाच्या वेळी तुलनेने या धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला म्हणून हे धरण भरण्यासाठी उशीर झालाय. मात्र मान्सूनच्या परतीचा पाऊस जोरदार बरसत असल्याने सध्या मांजरा नदीचे प्रति सेकंदास 4.918 घनमीटर एवढे पाणी धरणक्षेत्रात जमा होत आहे.


मांजरा धरणाची सद्यस्थिती...


1. प्रकल्पीय पूर्ण जलाशय पातळी (FRL) 642.37 मी
2. प्रकल्पीय पूर्ण पाणी साठा (G S.) 171.183/224.093 दलघमी
3. प्रकल्पीय उपयुक्त पाणी साठा (L.S.) 124.063/176.963 दलघमी
4. प्रकल्पीय मृत साठा (D.S.) 47.130/47.130 दलघमी
5. आजची पाणीपातळी (W.L.) 641.02/642.36 मी ( सकाळी 6 वाजता)
6. आजचा एकूण पाणीसाठा (G S.) 171.193/224.093 दलघमी
7. आजचा उपयुक्त पाणीसाठा (L.D.) 70.11 टक्के
8. उपयुक्त पाणी साठा 176.96 दलघमी