नाशिक : एकीकडे ड्युटीवर सतत गैरहजर राहणाऱ्या नागपूर पोलीस दलातील 15 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं, मात्र नाशिकमध्ये रजेवर असतानाही कर्तव्याला प्राधान्य देत पोलीस नाईक गुलाब सोनार यांनी सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या. या कामात गुलाब सोनार यांची पत्नी मदतीला धावून आली.


गुलाब सोनार हे नाशिकच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. 15 दिवस सुट्टीवर असणारे गुलाब सोनार दोन दिवसपूर्वी पुण्याहून नाशिकला येत असताना त्यांना संगमनेरजवळ दोन बाईकस्वार नाशिकच्या दिशेने येताना दिसले. संशय आल्याने त्यांनी बाईकस्वारांचा पाठलाग केला. रविवारी नाशिकला तीन चार ठिकाणी सोनसाखळी चोरीची घटना घडल्या होत्या. त्यातील फरार आरोपीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फोटो मॅच करुन बघितले. खात्री पटल्यावर नागरिकांच्या मदतीने सोनसाखळी चोरांना जेरबंद करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. मात्र नागरिकांची साथ मिळाली नाही. अखेर पत्नी आणि गाडीत असणाऱ्या एका नातेवाईकाच्या मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करत त्यांनी दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी मोटरसायकलसह चार-पाच सोनसाखळ्या जप्त करण्यात आल्या.


मूळचा लातूरचा राजू राठोड हा अट्टल सोनसाखळी चोर नाशिक पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड होता. सहा-सात वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र प्रत्येक वेळी तो निसटून जाण्यात यशस्वी ठरला. त्याची माहिती देणाऱ्यावर बक्षीसही ठेवण्यात आलं होतं. अखेर राजू आणि त्याचा साथीदार नागेश बडगर हे दोघे जेरबंद झाले आहेत.



हा थरारक प्रसंग घडत असताना गुलाब सोनार यांना त्यांच्या पत्नी ज्योती सोनार यांनी डगमगता मोलाची साथ दिली. दोघा गुन्हेगारांकडे तलवार, चॉपर असे धारदार शस्त्र होते. सोनसाखळी चोरांनी मिरचीची पूड असणारा स्प्रे गुलाब सोनार यांच्या डोळ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्योती यांच्या प्रसंगावधानामुळे तो प्रयत्न फसला.


ऑन ड्युटी 24 तास काम करणाऱ्या गुलाब सोनार यांनी सुट्टीवर असतानाही कर्तव्याला प्राधान्य देत जिवावर उदार होत धडाकेबाज कारवाई केलीय. यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोनारानेच सोनसाखळी चोरांना पकडण्याचा योगायोग घडला असला तरी राज्यभरातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना अभिमान वाटावा आणि नागरिकांनीही निडर होऊन चोरट्यांचा मुकबला करण्याचा संदेश या घटनेतून मिळाला.


Nashik Crime|सुट्टीवर असतानाही पोलिसांची धाडसी कारवाई;फिल्मी स्टाईलने पाठलाग करत सोनसाखळी चोराला अटक