मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबईप्रमाणेच पालघरमध्येही पावसाने चांगला जोर धरल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 180 मिलीमिटर तर एकूण 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. काल दिवसभरही मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.
मुंबईत गेल्या 24 तासात शहरात 127 मिमी, पश्चिम उपनगरात 170 मिमी व पूर्व उपनगरात 197 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
मुंबईप्रमाणेच पालघरमध्येही पावसाने चांगला जोर धरल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 180 मिलीमिटर तर एकूण 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सूर्या आणि वैतरणा या नद्या दुथडी वाहत असल्याने पालघरवासियांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. ज्याठिकाणी पाण्याची भीषण टंचाई होती अशा जव्हार-मोखाडा भागातही पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पंचगंगा, भोगावती आणि कुंभी नदीच्या पाणीपातळीत त्यामुळे वाढ झाली आहे. शहरातील कसबा बावडा परिसरातला राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीत जोरदार पाऊस झाला आहे.