मुंबई : महिनाभरापासून उघडीप दिलेल्या पावसाने (Rain Update) पुन्हा राज्यातील विविध भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लांबलेल्या पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली होती. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. बीड, हिंगोली, नाशिक आणि लातूरसह अनेक भागात जोरदार पाऊस झालाय. 


परळीत मुसळधार
बीड जिल्ह्यातील परळीत एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालंय.  एक तास विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तीन आठवड्यापासून पाऊस गायब झाल्याने शेतातील उभी पिके माना टाकू लागली होती. मात्र, आज झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.  


जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले 


जायकवाडी जलाशयातून शनिवारी सकाळी धरणाचे 18 दरवाजे चार फुटाने उघडून 80 हजार क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्याने नदीला मोठा पूर आला आहे. यामुळे गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर दत्तमंदिर व राक्षसभुवन येथील शनी महाराज मंदिर पुन्हा चौथ्यांदा पाण्यात बुडाले आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे. यंदा जायकवाडीतून पाणी नदीपात्रात पाणी सोडण्याची ही चौथी वेळ आहे. 


हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी 


आज हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे सर्व शेतकरी संकटात आले होते. हळद, तूर, कापूस आणि सोयाबीन यासारखी पीकं वाळून चालली होती. शेतकरी आभाळाकडे पावसाच्या आशेने बघत होता. आज झालेल्या पावसाने सर्व पिकांना जलसंजिवणी मिळाली आहे.  त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 


बेळगावात मुसळधार पाऊस


मुसळधार पावसाने बेळगाव शहर आणि परिसराला दीड तासाहून अधिक काळ झोडपून काढले. सकाळपासून वातावरण ढगाळ होते. वातावरणात उष्माही वाढला होता. दुपारी दोनच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर काही मिनिटातच जोरदार पावसाला सुरूवात झाली. मुसळधार पावसामुळे   बाहेर गावाहून गणपती बघण्यासाठी आणि खरेदीसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ठळकवाडी भागात रस्त्यावरून एक फूट पाणी वाहत होते. गोववेस येथील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये देखील काही दुकानात पाणी शिरले. भात पिकाला हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरला असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. 


लातूर शहर आणि परिसरात तुफान पाऊस


आज दुपारी लातूर शहर आणि परिसरामध्ये तुफान पाऊस झाला. दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. लातूर शहरालगत असलेल्या अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचं खूप नुकसान झालं आहे. 25 दिवसांच्या उघडीपीनंतर झालेल्या या तुफान पावसामुळे पिकांना जीवनदान मिळण्या ऐवजी पिके वाहून जाण्याची वेळ आली आहे. 


पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यानंतर महिनाभार उघडीप दिली. पाऊस नाही पडला तर नुकसान आणि पाऊस पडला नाही तरी ही नुकसान अशा दुहेरी कात्रीत बळीराजा अडकलाय. आवसा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कमी कालावधीत झालेल्या तुफान पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. ज्या शेतातून पाण्याला वाट नाही अशा ठिकाणी शेतीचे खूप नुकसान होत आहे.  निसर्गाच्या मारामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे
 
परभणीत मुसळधार पाऊस


अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पाऊस झालाय.  परभणी, मानवत, गंगाखेड, जिंतूर तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस आहे. परंतु, जिल्हायातील चार तालुके मात्र अद्याप कोरडेच आहेत. महिना भरापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर आज काही तालुक्यात दुपारनंतर जोरदार पाऊस बरसलाय.  त्यामुळे तिथल्या पिकांना काही दिलासा मिळाला आहे. पाऊस नसल्याने सोयाबीन ऐन शेंगा भरणीच्या काळात वाळू लागले होते. तोच आज पाऊस झाल्याने याठिकाणच्या सोयाबीन पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तर जिल्हाभरात सर्वत्र दमदार पावसाची आवश्यकता आहे.  



 महत्वाच्या बातम्या


Rain In Marathwada: गेल्या चार दिवसांत मराठवाड्यात 21 मिमी पाऊस, पहा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस 


Nashik Rain Record : दहा वर्षांत चौथ्यांदा नाशिकमध्ये 1000 मिमी पाऊस, मागील वर्षी 566 मिलीमीटर पाऊस