Nashik Rain Record : गेल्या दहा वर्षात नाशिक (Nashik) शहरात यंदा उच्चांकी पावसाची (Heavy Rain) नोंद करण्यात आली असून चौथ्यांदा 01 हजार अधिक पाऊस नाशिक शहरात बरसला आहे. तर मागील वर्षीपेक्षा हे प्रमाण दुपट्टीने असल्याचे सांगण्यात येत आहे. 


गेल्या काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तर दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र आजपर्यंतचा विचार करता जूनपासून आतापर्यंत म्हणजेच 05 सप्टेंबर पर्यंत नाशिक शहरात 1 हजार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर हाच पाऊस मागील वर्षी सप्टेंबरपर्यत 566 मिलीमीटर इतका होता. म्हणजे यंदा मागील वर्षी पेक्षा 400 हुन अधिक मिलीमीटर पाऊस अधिकचा कोसळला आहे. तसेच पावसाने सरासरी देखील ओलांडल्याने चार वर्षानंतर यंदा रेकॉर्डब्रेक (recordbreak Rain) पाऊस झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 


दरम्यान जून महिन्यात नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली. मात्र पुरेसा पाऊस न पडल्याने अनेक भागात पेरण्यांची कामे खोळंबल्याचे चित्र होते. मात्र   जुलैच्या प्रारंभीच पावसाने संततधार सुरू ठेवल्याने सर्वत्र पावसाचे आगमन झाले. शिवाय जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक पाऊस कोसळला. त्यामुळे शहरात रस्त्यांची दाणादाण उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. ते आजतागायत जैसे थे आहे. तर नाशिक शहराबरोबरच जिल्ह्याच्या इतर ठिकाणी बळीराजाला दमदार पावसाची आस लागून राहिली होती. मात्र जुलै महिन्यात आलेल्तीया धुवाधार पावसाने शेतकऱ्यांवरचे दुबार पेरणीचे संकट टळले होते. 


असा आहे मागील वर्षीचा पाऊस (05 सप्टेंबर पर्यंत) 
साधारण जून महिन्यापासून पावसाला सुरवात होते. दरम्यान जून 2021 मध्ये 101 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर अनुक्रमे जुलै 130, ऑगस्ट 126.4 , सप्टेंबर 199 अशी पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकूणच २०२१ मध्ये एकूण चार महिन्यात साधारण 566 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यातील आकडेवारी पाहिली असता जून 93, जुलै 558.4, ऑगस्ट 250.2, सप्टेबर 96.9 इतक्या मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहिली असता यंदा सप्टेबरच्या 5 तारखेपर्यंत 96 मिलीमीटर पाऊस झाला असून जून पासून ते आतापर्यंत 1 हजार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. 


दहा वर्षांची आकडेवारी 
दहा वर्षांची आकडेवारी बघता यंदाचे वर्षासहीत चारवेळा 1 हजार हून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. अनुक्रमे पाहिले असता 2013 
मध्ये 744.9 मिमी, 2014 मध्ये 755.5 मिमी, 2015 मध्ये 562.8 मिमी, 2016 मध्ये 1025.5 मिमी, 2017 मध्ये 1038.8 मिमी, 2018 मध्ये 608.5 मिमी, 2019 मध्ये 1234.4 मिमी, 2020 मध्ये 951.6 मिमी, 2021 मध्ये 566.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सप्टेबर 2022 पर्यत 1 हजार मिलीमीटर पाऊस शहरात बरसला आहे. तर साधारण मागील तीस ते चाळीस वर्षांचा विचार केला असता नाशिक शहरात पुढीलप्रमाणे पाऊस पडतो. जून 147 मिमी, जुलै 220 मिमी,  ऑगस्ट 170 मिमी, सप्टेबर 145.7 मिमी असा एकूण 692 मिलीमीटर साधारण पाऊस पडतो.