मुंबई : काही दिवसांपूर्वीच कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने धकड दिली. यात कोकणचे अतोनात नुकसान झाले आहे. या जखमा ताज्या असतानाचं आता दोन दिवासांपासून कोकणाला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे जाण्यायेण्याचे मार्ग बंद झाले असून अनेक ठिकाणीची वीजही गेली आहे. एक प्रकारे पुन्हा एकदा कोकणाचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
सिंधुदुर्गात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. कणकवलीत महामार्गाच्या धोकादायक भिंतीजवळ सर्व्हिस मार्गाच्या भिंतीला भगदाड पडले असून या ठिकाणी मार्ग वाहतुकीला धोकादायक झाला आहे. जिल्ह्यात सात जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविला आहे. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कणकवली
कणकवलीत फ्लायओव्हर ब्रिजचे काम सुरु आहे. या ब्रिजच्या भिंतीला आधीच तडे गेले आहेत. या भिंतीचे सिमेंट ब्लॉक केव्हाही कोसळतील अशी स्थिती निर्माण झाली असताना आता या भिंती शेजारीच सर्व्हिस मार्गाच्या संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे या ठिकाणी महामार्ग वाहतुकीला धोकादायक बनला आहे. गेले 24 तास जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. कणकवलीतील जाणवली आणि गड या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे.
तळकोकणात मुसळधार
तळकोकणातील मालवण तालुक्यात सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने कालावल खाडीपात्रलगत असलेल्या खोत जुवा बेटावर पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भरवस्ती काही घरात पाणी शिरले आहे. या बेटावर समस्त खोत बांधव एकत्रित राहत असुन येथे 30 कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील लोकसंख्या 100 इतकी आहे. येथील नागरिकांना दैनंदिन कामासाठी मालवण मध्ये बोटीने ये-जा करावी लागते. त्यामुळे त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणून येथील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रवाह वाढत चालला असल्याने भरवस्तीत पाणी शिरले आहे.
मुंबईत पावसाचा हायअलर्ट, हायटाईडमुळे समुद्रात 15 फुटांपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता
चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीची पातळी वाढली
कोकणातील रत्नागिरी जिल्हा मध्ये गेल्या दोन दिवसांत सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली, खेड, मंडणगड या ठिकाणी पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे. चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीची पातळी वाढल्याने बाजारपुलाला पाणी लागले आहे. त्यामुळे नदी पात्रजवळील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अजूनही या भागा मध्ये पावसाची संततधार चालू आहे.
दशकातला सर्वाधिक पाऊस आंबोलीत
यावर्षी दशकातला सर्वाधिक पाऊस आंबोलीत कोसळला आहे. आंबोली हे ठिकाण महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखली जाते. ज्या पद्धतीने देशात सर्वाधिक पाऊस चेरापुंजी त पडतो. तसाच पाऊस दरवर्षी आंबोलीत पडतो. याहीवर्षी आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आंबोलीत पडला आहे. एक जूनपासून आतापर्यंत 70 इंच पाऊस आंबोलीत पडला आहे. म्हणजे साधारणपणे 1700 ते 1800 मी. मी. पेक्षा जास्त पाऊस आंबोलीत पडला आहे. त्यामुळे याठिकाणी लहान मोठे धबधबे या आंबोलीच्या घाटात प्रवाहित झालेले पाहायला मिळतात. खरंतर आंबोली हा जैवविविधतेणे संपन्न असा प्रदेश आहे. आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे. दाट धुकं असल्याने घाटात प्रवास करताना गाडीच्या लाईट इंडिकेटर लावून प्रवास करावा लागत आहे. समुद्र सपाटीपासून 2500 फूट उंच असलेलं आंबोलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळ बंद असल्याने आंबोलीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
Chiplun Rain Update | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला