चंद्रपूर : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या इको सेन्सेटिव्ह झोनला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताल असलेलं 1346 चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून गृहीत धरल्या जाईल. या इको सेन्सेटिव्ह झोनमुळे ताडोबा लगत प्रस्तावित असलेल्या बंदर कोळसा खदानीला मोठा धक्का बसला आहे.


ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्याच नाही तर देशातील सर्वच पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा जीव की प्राण आहे. मात्र, हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प गेल्या काही वर्षांत अनेकदा संकटात सापडलाय. याला मुख्य कारण ठरले आहे, ताडोबाच्या आजूबाजूला येणारे उद्योग, कोळसा खाणी आणि पर्यटनाच्या नावावर उभारले जात असलेले हॉटेल आणि रिसॉर्ट्स. कधी कायद्याचा आधार घेऊन तर कधी रस्त्यावर उतरुन मूठभर पर्यावरणवादी कार्यकर्ते ताडोबाच्या मुळावर येणाऱ्या या गोष्टींना विरोध करत राहिलेत. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या याच लढ्याला आता एक महत्वपूर्ण यश आलय.


इको सेन्सेटिव्ह झोन भविष्यात ताडोबासाठी कवच-कुंडले
पर्यावरण विरुद्ध विकास हा चंद्रपूर जिल्ह्यात नेहमीच वादाचा मुद्दा राहिलाय. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूला भूगर्भात मोठ्या प्रमाणात कोळसा आहे. या कोळश्यावर अनेकांची नजर आहे. पण या कोळसा खाणी सुरु झाल्या तर वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग नष्ट होणार आहे. त्यामुळे हा इको सेन्सेटिव्ह झोन भविष्यात ताडोबासाठी कवच-कुंडले म्हणून काम करणार आहे.


पर्यटकांसाठी खुशखबर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला


बंदर कोळसा खाण प्रकल्पाला धक्का
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजूर केलेल्या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये ताडोबा पासून 3 ते 16 किलोमीटरचा भाग समाविष्ट आहे. हे क्षेत्रफळ जवळपास 1346 चौरस किलोमीटर इतकं आहे. ताडोबा लगतचा इतका मोठा भाग इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित झाल्याने प्रदूषणकारी उद्योग आणि कोळसा खाणींचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघालाय. सध्या चर्चेत असलेली बंदर कोळसा खाण याच इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये आहे हे विशेष.


ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा इको सेन्सेटिव्ह झोन ही गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांच्या सुरू असलेल्या एका लढ्याचं यश आहे. ताडोबाला कायद्याचं संरक्षण मिळालं असलं तरी ही कवच-कुंडले कायम अबाधित राहील याकडे सर्वांनाच लक्ष द्यावे लागेल.


Special Report | ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरू, बफर क्षेत्रातील 13 प्रवेशद्वारातून पर्यटकांना प्रवेश