मुंबई : मुंबईमध्ये काल कोसळलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरले होते. आज देखील मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह नवी मुंबई रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यातच आज 11.40 वाजता 4.57 मीटर एवढी हायटाईड देखील आहे. यामुळे 15 फुटापर्यंत लाटा समुद्रात उसळण्याची शक्यता आहे. याच वेळी जर जोरदार पाऊस झाला तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

काल सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस सुरु आहे. पावसामुळं सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरी या परिसरात काल जोरदार पावसाने हजेरी लावली. नेहमीचे सायन, हिंदमाता, वरळी नाका परिसर जलमय झाल्याचे चित्र काल पाहायला मिळाले.

काल दिवसभरात तब्बल 156 मिमी पावसाची मुंबईत नोंद





काल मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर आज देखील मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल दिवसभरात तब्बल 156 मिमी पावसाची मुंबईत नोंद झालीय. आज हवामान खात्याने मुंबईसोबतच पालघर, ठाणे, रायगड नाशिक या जिल्ह्यांला रेड अलर्ट दिला आहे. या संपूर्ण परिस्थिती नंतर आता एकच प्रश्न उरतो की काल ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठले होते. काल सारखी परिस्थिती आज होऊ नये, यासाठी आता आज महापालिका काय उपाययोजना करणार हाच प्रश्न आहे.



 पुढील 48 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टी : हवामान विभाग





यंदा वेळेवर आलेल्या मान्सूनचा काही काळ खंड पडला. मात्र थोड्याशा खंडानंतर अरबी समुद्रात मान्सूनला पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढील 48 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय.

पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्यात सर्वदूर पाऊस पडेल. आज, शनिवारी अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पाच तारखेपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आहे. सहा आणि सात तारखेनंतर पावसाचा प्रमाण कमी होईल. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 48 तास जोरदार अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात अनेक ठिकाणी सर्वदूर पाऊस पडेल. पाच तारखेला नंतर अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर पुढील 48 तासात नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे.

मुंबईसह अनेक जिल्ह्यात पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा

पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र घाट माथ्यावर पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा आहे. तर पाच, सहा आणि सात तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. माञ पाच ते सात तारखेला घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय.तर मराठवाड्यात ही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद आणि लातूरला आज शुक्रवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात आज शुक्रवारी अनेक ठिकाणी पाऊसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. चार ते सात तारखेपर्यंत चार दिवस सर्वदूर पाऊस पडेल. मात्र सहा आणि सात तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.