Hasan Mushrif Profile : कागल विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची डबल हॅट्ट्रिक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी आज सहाव्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित होते. मागील महायुती सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यामुळे तेच खातं त्यांना मिळणार की अन्य खातं दिलं जाणार याकडे सुद्धा लक्ष असेल. त्यांनी आज तिसऱ्या क्रमांकावर मंत्रीपदाची शपथ घेतली. 


हसन मुश्रीफ यांचा राजकीय इतिहास मोठा राहिला आहे. पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा आजवर प्रवास झाला आहे. आपल्याला उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याचे सुद्धा त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद नसलं तरी महत्वाचे कॅबिनेट मंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेवून त्यांचे प्रश्न सोडविणारा लोकनेता अशी त्यांची ओळख आहे. हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर शहरात शेंडापार्क राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत असून 1100 कोटी रुपयांच्या निधीतून 600 बेडचे सामान्य रुग्णालय, 250 बेडचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल व 250 बेडचे कॅन्सर हॉस्पिटल ही कामे सुरु आहेत.


हसन मुश्रीफ यांचा राजकीय प्रवास



  • जन्म दिनांक :- 24 मार्च 1954

  • शिक्षण :- बी. ए. ऑनर्स

  • ज्ञात भाषा :- मराठी, हिंदी, इंग्रजी

  • पक्ष :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी: अजित पवार गट

  • मतदार संघः- कागल, गडहिंग्लज, उत्तूर

  • भुषविलेली पदे :- 

  • सभापती, पंचायत समिती कागल

  • सदस्य, जिल्हा परिषद, कोल्हापूर

  • संस्थापक संचालक - श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल

  • संस्थापक व्हाईस चेअरमन- सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना,  सदाशिवनगर - हमीदवाडा.

  • उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी

  • दि. 20-11-1996 ते दि. 25-11-1999 अखेर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळला आहे.सन 1985 ते 2009 अखेर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यभार सांभाळला.

  • पहिल्यांदा ऑक्टोबर 1999 मध्ये विधानसभेवर निवड. मा. मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख मंत्रीमंडळात पधुसंवर्धन, दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.            

  • जुलै 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, औकाफ खात्याचे राज्यमंत्री

  • ऑक्टोबर 2004 मध्ये विधानसभेवर फेरनिवड. मा. विलासराव देशमुख मंत्री मंडळात 9 नोव्हेंबर 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, औकाफ व विधी व न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.

  • 10 डिसेंबर 2008 पासून नगरविकास, जमीन कमाल धारणा, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्यांक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्यांचा कार्यभार संभाळला आहे.

  • 22 ऑक्टोबर 2009 मध्ये विधानसभेवर तिसऱ्यांदा विक्रमी 46,412 मतांनी निवड. अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण मंत्रीमंडळात नगरविकास, कमाल जमीन धारणा, पशुसंवर्धन, दुग्ध्यविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्याक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्याचा राज्यमंत्री तसेच; कामगार व जलसंपदा या खात्याचा कॅबिनेटमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या