Prakash Abitkar : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज (15 डिसेंबर) पार पडत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्र्यांचा शपथविधी आणि विस्तार कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत असून यामध्ये शिवसेनेला 11 जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. यामध्ये उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भूसे, गुलाबराव पाटील या मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. नवीन चेहऱ्यांमध्ये योगेश कदम, आशिष जयस्वाल, भरत गोगावले, संजय शिरसाठ, प्रकाश आबिटकर यांना नव्याने संधी देण्यात आली आह. शिंदे यांच्या वाट्याला 12 मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन मंत्रीपद निश्चित
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात दोन मंत्रीपद निश्चित झाली आहेत. प्रकाश आबिटकरांना प्रथमच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ मंत्रीपदाची शपथ घेतील. हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच षटकार मारला आहे. प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून हॅट्ट्रिक केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द राखला
राधानगरीमधून आमदारकीची हॅट्ट्रिक केलेल्या प्रकाश आबिटकर यांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा एकदा निवडून दिल्यास त्यांना मंत्रीपदाचा बॅकलाॅग भरुन काढला जाईल, असा शब्द दिला होता. शिंदे यांनी मंत्रीपदाचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. दरम्यान, राधानगरी विधानसभा मतदारसंघ आजपर्यंत मंत्रीपदासाठी उपेक्षितच राहिला आहे. त्यामुळे आबिटकर यांना मंत्रीपदासाठी संधी दिली जावी अशी मागणी मतदारसंघासह जिल्ह्यातून सुद्धा होत होती. प्रकाश आबिटकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये राधानगरीमध्ये केलेला विकासकामांचा डोंगर हा त्यांची जमेची बाजू होती. त्यामुळे त्यांनी राधानगरी मतदारसंघातून 38 हजार मताधिक्याने विजय खेचून आणत आमदारकीची हॅट्रिक केली. या मतदारसंघातून हॅट्ट्रकि केलेले ते एकमेव आमदार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या