Sadabhau Khot on Gulabrao Patil: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या उपकंत्राटदाराने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच आक्रोश सुरु आहे. कंत्राटदार संघटनांनी याला सरकारी बळी म्हणत आतापर्यंत थकलेल्या बिलांची मागणी केली आहे. तब्बल 90000 कोटींहून अधिक बिल कंत्राटदारांची राज्य सरकारकडे बाकी आहेत. मात्र अजूनही त्याबाबत कोणतीही बिले देण्याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर गेल्या पाच महिन्यांपासून एक छदाम सुद्धा कंत्राटदारांना झालेल्या कामामधून अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे कंत्राटदार संघटनेमध्ये सुद्धा सरकारविरोधात आक्रोश सुरू आहे. दरम्यान कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर मात्र कंत्राटदार नसल्याचे सांगितलं. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल करतानाच कंत्राट पद्धतीमध्ये बदल करण्याची सुद्धा मागणी केली आहे.
गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा
सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हर्षल पाटील हा उपकंत्राटदार होता. तो मुख्य कंत्रादाराकडून कामे घेऊन करत होता. त्यामुळे काही ठिकाणी कामे करून सुद्धा त्याला पैसे मिळाले नव्हते त्यामुळे मंत्री म्हणून काम करत आहात तर मंत्रालयामधील बारकावे तुम्ही माहित हवे होते, जबाबदारपणे वक्तव्य करून नवतरुणांना नाउमेद करण्याचा प्रकार असल्याने तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी माझी मागणी असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले.
नाहीतर अनुभव घ्यायला ते अमेरिकेत जाणार का?
दरम्यान, कंत्राट पद्धतीमध्ये बदलाची गरज असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सिव्हिल इंजिनिअरला पाच कोटींचे मर्यादा घालून लायसन दिले गेले पाहिजे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. ते पुढे म्हणाले अनुभव जेव्हा विचारला जातो तर त्यांना कामे दिली तर त्यांच्याकडे अनुभव होईल, नाहीतर अनुभव घ्यायला ते अमेरिकेत जाणार का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. डिग्री चुलीत घालायची आहे का? असा सुद्धा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला. अनेक ठिकाणी सांगलीमधील कामाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की चार ते पाच कंत्राटदार आहेत. मग त्यांना 30- 50 गावांची काम एकाच वेळी करता येतील का? अशावेळी कंत्राट पद्धत बदलल्यास निश्चित बदल होईल असं त्यांनी सांगितलं.
ठराविक बोक्यांनाच कंत्राट मिळावं म्हणून
मात्र मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांनी ठराविक बोक्यांनाच कंत्राट मिळावं म्हणून हे होऊ देत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ऊर्जा विभागामध्ये चार-पाच जण कंत्राट भरत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलांनी वक्तव्य करताना किमान मला विचारायला हवं होतं, सगळेच कंत्राट देऊन लुटमार करत आहेत त्यामुळे खात्यामध्ये काय चाललंय याचा अभ्यास करा, असा टोला सदाभाऊ खोत यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या