Bhaskar Jadhav Dance With Prabhakar More: गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणजे खरोखरच एक अजब रसायन आहे. त्यांच्यामधला राजकारणी हा जितका मोकळाढाकळा आणि कुणाचीही भिडभाड न बाळगता बोलल्यानं स्वत:लाच अडचणीत आणणारा आहे, तितकाच त्यांच्यामधला कोकणी माणूस हा चिपळूणच्या (Chiplun) पट्ट्यातल्या प्रथापरंपरांचं निगुतीनं पालन करणारा आहे. गिरगावच्या साहित्य संघात बुधवारी झालेल्या सुवर्णभास्कर कार्यक्रमातही भास्कररावांनी पारंपरिक नृत्याचा आनंद लुटला. निमित्त होतं नमन नाट्य स्पर्धेच्या बक्षीस समारंभाचं... त्यात सोबतीला कोकणचे हास्यसम्राट प्रभाकर मोरे असल्यावर मग काय विचारता... अगं शालू... झोका दे गं मैना... या नमनगीतावर प्रभाकर मोरेंसोबत (Actor Prabhakar More) भास्कररावांनीही ताल धरला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

शिवसेना नेते, गटनेते आणि गुहागर विधानसभा क्षेत्राचे आमदार भास्कर जाधव यांच्या संकल्पनेतून 'सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025' चे आयोजन करण्यात आलं होतं. गुहागरमधील नमन कलावंतांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, या उदात्त हेतूनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे यांची खास उपस्थिती होती, त्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीच वाढली होती.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कोकणी माणसाची भूमिका साकारणारे आणि आपल्या अचूक टायमिंगने हसवणारे प्रभाकर मोरे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांचं 'अगं शालू झोका देगो मैना...' हे गाणं फारच लोकप्रिय झालं आहे. हे गाणं कुठेही वाजलं तरी प्रत्येकालाच या गाण्यावर ठेका धरावासा वाटतो. पण, यावेळी चक्क आमदार भास्कर जाधव यांनी प्रभाकर मोरेंसोबत या गाण्यावर ठेका धरल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या प्रभाकर मोरे आणि भास्कर जाधव यांनी 'अगं शालू झोका देगो मैना...' या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दरम्यान, 'सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025' स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक आणि अभिनेते प्रभाकर मोरे यांच्यासोबत भास्कर जाधवांनी धम्माल उडवून दिली. भास्कर जाधवांचा उस्फूर्त डान्स पाहून संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं दणाणून गेलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला जात आहे. 

पाहा व्हिडीओ : Bhaskar Jadhav Dance : भास्कर जाधवांनी प्रभाकर मोरेंसोबत शालूवर धरला ठेका