'चुना कसा लावतात त्यांना माहिती नाही, वेळ येईल तेव्हा मी चुना लावेल'; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल
Gulabrao Patil On Sanjay Raut : गुलाबराव पाटील यांना पानटपरीवर पाठवू असं राऊत यांनी म्हटलं होतं. यावर आता गुलाबराव पाटील यांनी प्रतिहल्ला केला आहे. गुवाहाटीमधून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Gulabrao Patil On Shiv Sena And Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी यात गुलाबराव पाटील यांच्यावर देखील टीका केली होती. गुलाबराव पाटील यांना पानटपरीवर पाठवू असं राऊत यांनी म्हटलं होतं. यावर आता गुलाबराव पाटील यांनी प्रतिहल्ला केला आहे. गुवाहाटीमधून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात गुलाबराव पाटील हे भाषण करताना दिसत आहेत. यात गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, मला टपरीवर पुन्हा पाठवू संजय राऊत सांगतात. चुना कसा लावतात माहिती नाही त्यांना अजून. वेळ येईल तेव्हा मी लावेल त्यांना चूना. आपण इथं कसे कसे आलो आहोत हे सांगण्याची गरज नाहीय पण आता आपल्याला एकत्रितपणे ही लढाई लढायची आहे, असं ते म्हणाले. आम्ही आमच्या घरी तुळशीपत्र ठेऊन काम केलेले लोक आहोत. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबावाले नाही आहोत आम्ही, असा टोला देखील गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, आपल्यावर जिल्ह्यामध्ये, मतदारसंघात आरोप प्रत्यारोप होतायत. पण ते होत असतानाच बऱ्याच पद्धतीने लोक सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहत आहेत. दोन्ही प्रकार सुरु आहेत. आपल्यावर तर भरपूर टीका झालीय. पदं काढून घेऊ, तुमचे बाप किती… आता आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहिती नाहीय, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही काहीच केलं नाहीय का त्यांच्यासाठी? आम्ही भरपूर केलेलं आहे. आमची परिस्थिती ज्यावेळेला नव्हती त्यावेळी काय काय केलंय हे आम्हाला माहितीय. हे जे मिळालंय ते निश्चितपणे त्यांच्या आशिर्वादने मिळालंय पण आमचाही त्यामध्ये काही त्याग आहे, असंही गुलाबराव म्हणाले आहेत.
व्हिडीओत गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, ज्यावेळेस मैदान येईल तेव्हा सभागृहामध्ये त्यांना चर्चेमध्ये पराभूत करण्यासाठी आपण जे 39 आणि आपले 12-14 अपक्ष मंडळी आहेत तेवढेच पुरेसे आहेत. मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडला, आपल्यासारख्या 52 आमदारांना सोडलं. पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, असंही ते म्हणाले. ते केवळ बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन क्रिया केलेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे 20 टक्के स्वत:चा सहभाग आहे. 80 टक्के संघटनेची सोबत असली तरी 20 टक्के आपली मेहनत आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले की, 1993 च्या दंगलीमध्ये आम्ही तिघं भाऊ आणि बाप तुरुंगामध्ये होतो. त्यावेळेस संजय राऊत कुठे होते माहिती नाही. 56 ब काय असतं हे संजय राऊतांना माहिती नाही. 302 काय असतं माहिती नाही. पण आम्ही ही सगळी भोगलेली आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.