औरंगाबाद : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा (Assembly-Lok Sabha Elections) गावकऱ्यांना जेवढा उत्साह नसतो तेवढा गावच्या राजकारणात आणि ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे, ग्रामपंचायत निवडणुक असो की, सरपंच (Sarpanch) पदाची निवड असो अनेक ठिकाणी वादावादीच्या घटना समोर येत असतात. एवढंच काय तर सरपंच पदाच्या निवडणुकीत चक्क ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी पाहायला मिळते. आता असाच काही प्रकार औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात समोर आला आहे. वैजापूर तालुक्यातील पेंडेफळ गावात चक्क एका पंच्याहत्तर वर्षीय उपसरपंचांचेच अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अविश्वास ठराव आणण्याच्या कारणावरून हे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी शिऊर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल रामकृष्ण चव्हाण (75 वर्षे, रा.पेंडेफळ, वैजापूर) असे अपहरण करण्यात आलेल्या उपसरपंचाचं नाव आहे. 


दरम्यान, उपसरपंच विठ्ठल चव्हाण यांचे पुत्र नवनाथ चव्हाण यांनी शिऊर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे वडील विठ्ठल चव्हाण हे पेंडेफळ गावचे उपसरपंच आहे. गावातील ग्रामपंचायतमधील काही सदस्यांनी येथील सरपंचावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला होता. तर, 7 सप्टेंबर रोजी कुटुंबातील सर्व सदस्य रात्री सोबत जेवले. त्यानंतर विठ्ठल चव्हाण हे बाजुच्या खोलीत झोपायला गेले.


मात्र, रात्री साडेअकरा वाजता त्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांचे पुत्र नवनाथ चव्हाण घराबाहेर आले असता तोंड बांधलेले काही लोक त्यांच्या वडीलांना एका वाहनात नेत होते. यावेळी नवनाथ चव्हाण यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गाडीत आलेले लोकं त्यांच्या वडीलांना घेऊन पसार झाले. त्यामुळे, सरपंच पती शिवाजी आबाराव आहेर आणि सोपान शिवाजी आहेर यांच्या सांगण्यावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी माझ्या वडीलांचे अपहरण केल्याचा संशय असल्याचे चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


काय आहे राजकारण? 


पेंडेफळचे सरपंच मनिषा आहेर यांच्यावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यामुळे यावर शुक्रवारी (8 सप्टेंबर) रोजी दुपारी दोन वाजता ठराव पारित केला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच म्हणजे एक दिवस आधीच रात्री साडेअकरा वाजता उपसरपंच विठ्ठल रामकृष्ण चव्हाण यांचे अज्ञात लोकांनी अपहरण केले. या प्रकरणी गावात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेमुळे अविश्वास ठराव बारगळला आहे. मात्र, चक्क एका पंच्याहत्तर वर्षीय उपसरपंचांचेच अपहरण केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली असून, पोलिसांकडून देखील याबाबत तपास केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Election : अविश्वास ठरावाने हटवलेल्या संरपंचाला पुन्हा पोटनिवडणूक लढवता येणार; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय