राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट
12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल राज्यपालांनी विनाविलंब निर्णय घ्यावा असा सल्ला मुंबई हायकोर्टाने दिला आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. मागील 8 महिन्यांपासून पासून 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन चर्चेत असणाऱ्या कोश्यारी यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काल कोर्टाने राज्यपालांना सल्ला दिल्यानंतर या भेटीच्या वेळेवरही चर्चा सुरू झाली.
12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल राज्यपालांनी विनाविलंब निर्णय घ्यावा असा सल्ला मुंबई हायकोर्टाने दिला आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नामनिर्देशित 12 सदस्यांच्या नावांच्या शिफारशी ठाकरे मंत्रिमंडळाने पाठवून आठ महिने उलटून गेले आहेत. मात्र राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. याच मुद्द्यावरून आज संजय राऊत यांनीही राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं
घटनात्मक पेचप्रसंग राज्यपालांकडून निर्माण होऊ नये असं कोर्टाने सांगितलं आहे. राज्यपालांनी स्वत:ला राजकीय प्यादं म्हणून वापरायला देऊ नये. ते पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते किंवा संघाचे प्रचारक असू शकतात. त्यावर आमची काही भूमिका किंवा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण घटनेनुसार राज्यांच्या अधिकारांवर, कॅबिनेटच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असतील तर हे या देशाच्या संघराज्यावर हल्ला आहे.
सध्या भाजपमध्ये पक्षीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेते दिल्लीत जाऊन आले. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचीही गुप्त भेट झाली. आता राज्यपाल अमित शहा यांना भेटले आहेत. त्यामुळे यात बारा आमदारांचा मुद्द्यांची चर्चा नक्की झाली असेल.
राज्यपालांनी बारा आमदारांच्या प्रस्तावावर निर्णय न घेणे ही घटनात्मक अधिकारांची पायमल्ली असल्याचा आरोप याचिकेतून झाला. प्रकरण कोर्टात गेलं पण तरीही बारा जागांचा पेच मात्र सुटला नाही. सध्या बारा आमदारांची स्थिती जैसे थे आहे. त्यामुळे अमित शहा यांना भेटून हा गुंता सुटतो की आणखी वाढतो हे बघावं लागेल.
संबंधित बातम्या :