गोपीचंद पडळकर आणि मंगळसूत्र जाईल तिथं समीकरण पाठ सोडेना, पण तो प्रसंग आहे तरी काय? सदाभाऊंनी घटनास्थळाची स्टार्ट टू एंड स्टोरी सांगितली
सदाभाऊ खोत यांनी सभागृहामध्ये बोलताना मंगळसूत्र चोरीचा किस्सा सांगितला आणि एखाद्याला निर्दोष सोडलं असेल तर आणि चोर चोर म्हणत असाल तर उद्रेक होणार असं म्हणत राष्ट्रवादीवर तोफ डागली.

Gopichand Padalkar and Mangalsutra: भाजपचे बेलगाम आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गेल्या काही दिवसांपासूनच्या वक्तव्यांनी महाराष्ट्रामध्ये वादाची किनार गाठली आहे. सातत्याने गोपीचंद पडळकर यांच्याकडून पवार कुटुंबीयांवर अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये टीका होत आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांमधील नेत्यांवरही गोपीचंद पडळकर यांच्याकडून पातळी सोडून टीका होत आहे. मात्र, गोपीचंद पडळकर यांना सातत्याने मंगळसूत्र चोर म्हणून संबोधले जाते. त्यांच्यावर सातत्याने मंगळसूत्र चोरीचा आरोप होत आहे. त्यामुळे आव्हाड आणि पडळकर वादाला मंगळसूत्र चोर घोषणा सुद्धा कारण ठरली. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबावर अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. या टीकेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा विधानसभेच्या प्रांगणामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख मंगळसूत्र चोर असा केला.
मंगळसूत्र चोरीचा किस्सा सांगितला
त्यामुळे तो मंगळसूत्र चोरीचा किस्सा आहे तरी काय? याची माहिती आज त्यांचे दोस्त आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली. सदाभाऊ खोत यांनी सभागृहामध्ये बोलताना मंगळसूत्र चोरीचा किस्सा सांगितला आणि एखाद्याला निर्दोष सोडलं असेल तर आणि चोर चोर म्हणत असाल तर उद्रेक होणार असं म्हणत राष्ट्रवादीवर तोफ डागली. तो संपूर्ण किस्सा सदाभाऊ खोत यांनी आपल्या सभागृहामधील चर्चेमध्ये बोलताना सांगितला.
कार्यकर्त्यांना उचकावलं आणि गुन्हा दाखल करायला लावला
सदाभाऊ खोत म्हणाले की, माझे मित्र (गोपीचंद पडळकर) खरसुंडी तालुका आटपाडी येथे एका लग्नाला गेले होते. ते लग्न झाल्यानंतर माझे मित्र 2 तासांनंतर त्या लग्नाच्या ठिकाणी पोहचले. त्यापूर्वी तिथ पाहुण्यांची भांडणं झाली होती. त्याठिकाणी ज्यांची भांडण झाली होती त्यांची राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची जवळीक होती. त्यांनी कार्यकर्त्यांना उचकावलं आणि गुन्हा दाखल करायला लावला. एका 65 वर्षाच्या महिलेला यांनी गुन्हा दाखल करायला लावलं. मात्र, कोर्टातून माझ्या मित्राला कोर्टाने निर्दोष सोडलं. कारण त्या महिलेने केस मागे घेतली. तरीसुद्धा हे न पाहता तुम्ही एखाद्याला चोर, चोर, चोर म्हणत असाल तर उद्रेक होणार. ते पुढे म्हणाले की, मागील 65 वर्षात पिण्याचं पाणी दिलं नाही, शेतीला पाणी दिलं नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव दिलेला नाही. शेतकरी आंदोलन करायला गेला तर तुम्ही लाठ्या चालवल्या, बँका तुमच्या काळात रसातळाला गेल्या, साखर कारखाने विकून खाल्ले, सूतगिरण्या विकून खाल्ल्या, रस्त्यावरच डांबर विकून खाल्ल, मुरूम विकून खाल्ला हे सगळं काढलं आणि तुम्हाला दरोडेखोर दरोडेखोर म्हणालो तर तुम्हाला चालेल का?
इतर महत्वाच्या बातम्या
























