Gondia News गोंदिया : तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या 12 मे रोजी होत आहे. त्यामुळे आता या निवडणुकीचं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या बाजार समितीच्या तत्कालीन सभापती आणि संचालकांनी बारा वर्षांपूर्वी आधारभूत धान खरेदी केंद्र गावनिहाय जोडणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणाबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) आणि राज्य शासनाच्या पणन विभागानं आता तुमसर बाजार समिती प्रशासनाला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश बजावले आहेत. यामुळं बाजार समिती प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब अत्यंत गोपनीय ठेवून दोन दिवसांपूर्वी माहिती सादर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 


बाजार समितीतीवर सीआयडीचा वॉच


तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्व विदर्भात तसेच राज्यात धान आणि तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. दरवर्षी कोट्यवधींच्या नफा या बाजार समितीला होतो. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, सध्या ही बाजार समिति एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. यात बारा वर्षांपूर्वी आधारभूत धान खरेदी केंद्राला गाव जोडणी कशी करण्यात आली, याची सविस्तर माहिती राज्य सीआयडी आणि पणन महासंघानं निवडणुकीच्या तोंडावर मागितली आहे. यात अनियमितता झाल्याची शंकाही सीआयडी आणि पणन महासंघाला आहे.


तब्बल बारा वर्षांनंतर हे जुने प्रकरण उकरून काढण्यामागील नेमके कारण काय, असा प्रश्न आता साऱ्यांना पडला पडला आहे. परिणामी ही एक राजकीय खेळीतर नाही ना? तसेच येथे कुठल्या दबाव तंत्राचा तर वापर करण्यात येत नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे. बाजार समिती आपल्या हातात राहावी याकरिता महाविकास आघाडी आणि महायुती येथे प्रयत्नशील आहे. ही निवडणूक बाजार समितीची असली तरी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. त्यात हे प्रकरण चक्क 12 वर्षांनी उकरून निघण्यामागे ही निवडणूक तर कारणीभूत ठरत नाहीये ना? अशीही चर्चा आहे.  


एकूण 58  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीकरिता 2 मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी एकूण 72 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता एकूण 58  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे 18 संचालक पदांकरिता येत्या 12 मे रोजी निवडणूक होत आहे. तर 13 मे ला मतमोजणी होणार असून अनेकांचे भवितव्य त्या दिवशी ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या