Bajaj Finser Investment in Pune : राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रोजगार निर्मिती होत नाही, असा आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर सुरु होता. मात्र आता या सरकारने बजाज फिनसर्व्ह सोबत सामंजस्य करार केला आहे. बजाज फिनसर्व्ह 5,000 कोटी रुपये गुंतवणुक केली आहे. या गुंतवणुकीमुळे आयटी हब असलेल्या पुण्यात आता 40 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. राज्यातील आणि देशातील तरुणांसाठी ही गुंतवणूक फार महत्वाची ठरणार असून पुणे शहराला चालना मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यात सुमारे 5,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे आयटी हब असलेल्या पुण्यात आता 40 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज यांच्या उपस्थितीत हा करार झाला. त्यामुळे आता पुणे शहराची वित्तीय हब अशी ओळख निर्माण होणार आहे. या रोजगारामुळे पुणे शहराला चालनादेखील मिळणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. बजाज फिनसर्व कंपनी राज्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुणे शहरात होणार आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यात झालेली ही सगळ्यात मोठी गुंतवणूक असल्याचं फडणवीस म्हणाले आहे.
मागील काही महिन्यांपासून राज्यातील काही मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. या सगळ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. यावरुन राजकीय वातावरण तापलं होतं. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची होती आणि यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार होती मात्र हाच प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने अनेक तरुणांचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे, एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ, महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे चांगलं असल्यामुळे या प्रकल्पासाठी पुण्याजवळील तळेगावची निवड केली होती. मात्र हा प्रकल्प पुण्यात न होता तो गुजरातला गेला आणि गुजरातमध्ये रोजगार निर्मिती झाली. मात्र बजाज फिनसर्व यांच्या गुंतवणुकीमुळे पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.