गोंदिया: नागपूर (Nagpur)परिघात अनेक व्याघ्र प्रकल्प (Tiger Project) असल्याने नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख प्राप्त झाली आहे. देशासह जगभरातील व्याघ्रप्रेमींना विदर्भातील व्याघ्र प्रकल्प भुरळ पाडत आले आहे. अशातच आता व्याघ्रप्रेमींसाठी एक आनंददायी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षभरपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (Navegaon Nagzira Tiger Reserve) चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांना (Tiger)सोडलं होतं. त्यानंतर आता या व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध असलेल्या टी-4 या वाघिणीने तिच्या दोन बछड्यांसह दर्शन दिले आहे. जंगल सफरीला आलेल्या काही पर्यटकांनी त्यांचा व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमावर प्रसिद्ध केले असता ते प्रचंड वायरल होत आहे. त्यामुळे आगामी काळात नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रप्रेमींची वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. 


टी 4 वाघीण आणि तिचे दोन बछड्यांसह दर्शन 


गोंदिया जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक हे वाघ आणि इतर प्राणी पाहण्यासाठी हौसेनं येतात. गेल्या काही वर्षात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे व्याघ्र वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मागील वर्षी याच व्याघ्र प्रकल्पात राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत, चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांना या व्याघ्र प्रकल्पात सोडलं होतं. असा हा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे वाघासह इतर प्राण्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.


येथे पूर्वी वाघ दर्शन होईल या आशेने पर्यटक यायचे, मात्र त्यांना हे दर्शन क्वचितचं व्हायचे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातून दोन वाघ येथे सोडल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. सध्या या व्याघ्र प्रकल्पातील विविध गेटवरून येणाऱ्या पर्यटकांना वाघाचे सहज दर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. 


पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता


अशातच भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील पिटेझरी गेटवरून पर्यटक व्याघ्र दर्शन आणि जंगल सफारीसाठी प्रवेश घेतात. इथं पर्यटकांना प्रकल्पातील एका पुलावर टी 4 वाघीण आणि तिचे दोन बछडे आप-आपसात मस्ती करत असतानाचे दर्शन झाले. पर्यटकाने आपल्या मोबाईलमध्ये त्यांचे चित्रफीती काढली असून ती चित्रफीती आणि त्यांचे काही फोटो सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. त्यामुळे आता नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघाचे दर्शन होत असल्याने आगामी काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या