कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत आता सत्ताधारी गट विरोधी गटाला एक-एक धक्के द्यायला सुरुवात झालीय. पन्हाळा तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या रुपानं सतेज पाटील यांच्या शाहू विकास आघाडीला धक्का दिलाय. त्यामुळं आघाडी जाहीर करण्यात जरी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली असली तरी सत्ताधारी गट शांत पद्धतीनं हालचाली करत असल्याचं सध्या तरी दिसत आहे. सत्यजित आबा पाटील यांच्याबरोबर आणखी काही नेते सत्ताधारी गटाच्या गळाला लागणार असल्याची चर्चा सुरु झालीय. त्यामुळं विरोधकांची एकत्र मोट बांधलेल्या सतेज पाटील गटात अस्वस्थता पसरली आहे.
22 मार्च रोजी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांसह शक्ती प्रदर्शन करत राजर्षी शाहू आघाडी घोषित केली. त्यामध्ये सत्ताधारी गटातील काही मंडळी देखील या आघाडीत सहभागी झाले. यामध्ये विश्वास पाटील, अरुणकुमार डोंगळे, गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव चुयेकर यांच्या पत्नी सतेज पाटील गटासोबत राहण्यास तयार झाल्या. सर्व काही आलबेल असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांसमोर कोणता पर्याय असं चित्र निर्माण करण्यात आलं. पण नेत्यांची बहुगर्दी झाली आणि एक-एक नेता आपली नाराजी व्यक्त करु लागले.
राजर्षी शाहू आघाडीत शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे देखील आहेत. त्यांनी मातोश्रीवरुन आदेश आल्याचं सांगितलं होतं. पण शिवसेनेच्याच काही नेत्यांनी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कागलचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा समावेश आहे. त्याच वेळी शिवसेनेचे माजी आमदार 22 तारखेच्या मिटींगला उपस्थित होते. त्यांनी देखील सतेज पाटील गटाला पाठिंबा दिला होता. पण राज्यात भाजपला साथ देणारे आणि शाहुवाडी-पन्हाळाचे आमदार विनय कोरे यांनी विरोधी गटाला साथ देताच सत्यजित आबा पाटील नाराज झाले.
विधानसभेचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून काम करायचे तर आबांची गोकुळमध्ये अडचण झाली. विधानसभेला ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत गोकुळमध्ये कसे बसायचे हा प्रश्न आबांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळं अवघ्या दोन दिवसात शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांनी विरोधकांच्या सोबत जाणं ही चूक होती. असं म्हणत पुन्हा एकदा सत्ताधारी म्हणजे महादेवराव महाडिक आणि पी.एन पाटील यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
प्रकाश अबिटकर आणि राजेश पाटील काय भुमिका घेणार?
विरोधकांनी जोरदारपणे सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी हळूहळू शांत पद्धतीनं हालचाल करत आहेत. राधानगरी-भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर आणि चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांची भुमिका अजून स्पष्ट झाली नाही. विधानसभा मतदार संघातील राजकारणामुळं या नेत्यांना भुमिका घेणं अवघड झालंय.. मात्र, असं असलं तरी सत्ताधारी आणखी काही मोठे नेते आपल्यासोबत येणार असल्याचा दावा करत आहेत.