कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी अगदी शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोणता नेता कोणत्या गाडीसोबत उभा राहणार याची गणितं सुरू झाली आहेत. बैठकांचे सत्र दिवस-रात्र सुरू आहे. अशावेळी कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांनी हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या कुस्तीवर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. पुस्तक प्रकाशन सोहळा लांबल्यामुळे सतेज पाटील भाषणाला उभे राहिले. भाषण करताना सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात देखील दुधाची कुस्ती सुरू झाली आहे. बैठकीला उशीर झाल्यामुळे अनेक पैलवान आमची वाट बघत आहेत. त्यामुळे आम्हाला कार्यक्रमातून बैठकीला जाण्याची परवानगी द्यावी. आमचे वस्ताद हसन मुश्रीफ साहेब आहेत. ते आपल्या भाषणात शेवटचा पट सांगतील. सतेज पाटील असं म्हणतात शाहू स्मारक सभागृहांमध्ये एकच हशा पिकला.


गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी विरोधकांची राजर्षी शाहू विकास आघाडी उभा केली आहे. जिल्ह्यातल्या अनेक मातब्बर नेत्यांनी या आघाडीला पाठिंबा दिला. मात्र, आघाडीमध्येच नेत्यांची गर्दी झाल्याने आणि स्थानिक राजकारणामध्ये अडचणी येत असल्याने अनेकजण आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. तर शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी पुन्हा सत्ताधारी गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी गटाने जिल्ह्यातील अजूनही अनेक नेते आपल्या संपर्कात आहेत असा दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही बाजुंनी नेत्यांची मनधरणी सुरू झाली आहे.


गोकुळमध्ये विरोधकांना पहिला ‘दे धक्का’, सत्यजित पाटील-सरुडकर सत्ताधारी गटात सहभागी


कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघासाठी 2 मे रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल लागणार आहे. सत्ताधारी गटातील अनेक नेते विरोधी गटांमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीमध्ये रंग चढणार हे नक्की झालं आहे. गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या महादेवराव महाडिक आणि पी एन पाटील यांची सत्ता सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ खालसा करणार का? हे पाहावे लागणार आहे.