गडचिरोली : जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर 1993 मध्ये दारुबंदी कायदा लागू करण्यात आला. सलग 27 वर्ष टिकून असलेल्या दारुबंदीला धक्का लागण्याची शक्यता बळावली असताना आज जिल्ह्यातील 1 हजार 2 गावं दारुबंदीच्या समर्थनात उभी आहेत. या ऐतिहासिक दारुबंदीची अंमलबजावणी करा, असं पत्र देखील या गावांनी शासनाला लिहिलं आहे. सध्या जिल्हा दारुमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यावतीनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 838 गावांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.


दारुमुळं आदिवासींचं, मजुरांचं होणारं शोषण व महिलांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी व विविध गावांनी एकत्र येऊन दारुमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दारुबंदीसाठी 1987-93 या कालावधीत जिल्हाव्यापी आंदोलन झालं. या आंदोलनाची दखल घेऊन शासनानं 1983 मध्ये शासकीय दारुबंदी लागू केली. 1983 पासून 2015 पर्यंत गावा-गावात दारुबंदी लागू झाली. आताच्या घडीला ही ऐतिहासिक दारुबंदी उठविण्यासाठी हालचाली सुरु असल्याचं कळताच पुन्हा एकदा शेकडो गावांनी आंदोलन उभारण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्हा दारुमुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभय बंग यांच्या पत्रासह 838 गावांची निवेदनं संघटनेचे उपाध्यक्ष तथा आदिवासी नेते देवाजी तोफा, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांच्या उपस्थितीत जिल्ह्याधिकारी यांना सादर करण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्हाभरातील 1 हजार 2 गावांनी अशा प्रकारचा ठराव घेऊन दारुबंदीला समर्थन दर्शवलं आहे.


जिल्ह्यात 27 वर्षांपासून टिकून असलेली दारुबंदी उठविल्यास व्यसनामुळं संसाराची धूळधाण होईल, घरात वाद-विवाद वाढतील, दारिद्रयपणा येईल, शांतता भंग होईल, सुखी संपन्नता नष्ट होईल.नागरिकांची आर्थिक बाजू कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं जिल्ह्यातील दारुबंदी मुळीच हटवू नये, दारुबंदीची अंमलबजावणी अधिक प्रबळ करून नियम भंग करणा-यास देण्यात येणाऱ्या शिक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी करीत जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 2 गावं दारुबंदी कायम ठेवण्यासाठी पुढं आली आहेत. गावा-गावात ठराव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहण्यात येत असून त्यामाध्यमातून दारुबंदीची कडक अंमलबजावणी करा, अशी विनंती केली जात आहे.


दारुबंदी कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या गावांमध्ये अहेरी तालुक्यातील 62, आरमोरी 49, भामरागड 82, चामोर्शी 96, देसाईगंज 28, धानोरा 122, एटापल्ली 118, गडचिरोली 101, कोरची 92, कुरखेडा 89, मुलचेरा 62, आणि सिरोंचा तालुक्यातील 101 गावांचा समावेश आहे. असे एकूण 1 हजार 2 गावं दारुबंदीच्या समर्थनात उभी आहेत.


पहा व्हिडिओ: WEB EXCLUSIVE | गडचिरोलीमध्ये दारुबंदी का आवश्यक आहे? | डॉ. अभय बंग



संबंधित बातम्या: